| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२४ एप्रिल २०२४
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा अगदी योग्य निर्णय घेतला आहे. त्यांनी देशाच्या विकासाला महत्त्व दिले आहे. ते सत्तेबाहेर असले तरी लोकांना न्याय मिळावा आणि त्यांची कामं झाली पाहिजेत, ही राज ठाकरे यांची भावना आहे. राज ठाकरे हा अगदी मोकळ्या मनाचा माणूस आहे, तो कद्रू किंवा कोत्या मनोवृत्तीचा नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते बुधवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची मुक्तकंठाने तारीफ केली. तसेच आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला त्यांचा वाटा मिळू शकतो, असे संकेतही दिले. काँग्रेस पक्षाने देशाला 50-60 वर्षात खड्ड्यात घातले. पण मोदीजी देशाचा विकास करत आहेत. त्यामुळेच राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला. त्यांनी घरी बसणाऱ्यांना आणि फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना किंवा शिव्याशाप देणाऱ्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता का? राज ठाकरे यांनी मोदींना आणि महायुतीला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
राज ठाकरेंमुळे महायुतीला फायदा होईल का? एकनाथ शिंदे म्हणाले...
महायुतील राज ठाकरे यांची काय गरज होती, त्यांच्या येण्याने शिंदे गटाची अडचण झाली का, असे प्रश्न एकनाथ शिंदे यांना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आम्ही सगळे एकत्र आलो तर निवडणुकीत त्याचा फायदा होणारच आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देताना कोणतीही अट ठेवलेली नाही. आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला काय द्यायचं, याचा विचार होऊ शकतो, आता काहीच ठरलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आम्ही लवकरच एकत्र दिसू. याशिवाय, राज ठाकरे स्वतंत्रपणे सभा घेतील, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.