| सांगली समाचार वृत्त |
मुंबई- दि.२१ एप्रिल २०२४
सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. देशपातळीवर एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या थेट लढती होत आहेत. या सर्व निवडणुकांचे निकाल 4 जूनला लागणार आहेत. या निकालात कोण जिंकतं? कुणाची सत्ता येते? हे खऱ्या अर्थानं स्पष्ट होणार आहे. पण, याला आणखी जवळपास दीड महिना शिल्लक असतानाच आता इंडिया आघाडीत पंतप्रधानपदावरून दावे-प्रतिदावे सुरू झाल्याचं दिसंतय.
खरंतर लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्राचा विचार करता 4 आणि देशाचा विचार करता आणखी 6 टप्पे शिल्लक आहेत. हे टप्पे पूर्ण व्हायला आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण, निकालाआधीच इंडिया आघाडीत पंतप्रधानपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसतंय, त्याचं कारण ठरलंय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बुलंद तोफ असलेल्या संजय राऊतांचं विधान
काय म्हणाले संजय राऊत ?
'आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहत होतो, कधीतरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील, पण अंतर्गत राजकारणामुळे शरद पवारांसारखा नेता, त्यांचं कतृत्व असतानाही त्यांना संधी मिळाली नाही, याचं आम्हाला वाईट वाटतं. उद्धव ठाकरेंना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरेंना पसंती देतील. एक उमदा चेहरा आहे, महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं आहे. कोरोना काळात एक राज्य सांभाळलं आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची भूमिका आहे. या देशाला आज अशा सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे', असं संजय राऊत म्हणाले.
आता राऊतांनी थेट पंतप्रधानपदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केल्यावर काँग्रेस पक्ष तरी कसा शांत राहणार? राऊतांच्या या दाव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार पलटवार करत, त्यांच्या दाव्याची हवा काढण्याचा प्रयत्न केला.
नाना पटोलेंचा पलटवार
'संजय राऊत रोज आपली स्टेटमेंट बदलतात, त्यामुळे संजय राऊतांच्या स्टेटमेंटला फार काही व्हॅल्यू देऊ नका. कालपर्यंत राहुल गांधींना प्रधानमंत्री बनवायला निघाले, आज त्यांना उद्धव ठाकरे दिसत आहेत, त्यामुळे याच्यावर फार लक्ष घालू नका. संजय राऊतांनीही अशाप्रकारचं वक्तव्य करू नये', असा इशाराच नाना पटोलेंनी दिला आहे.