| सांगली समाचार वृत्त |
बारामती - दि.२४ एप्रिल २०२४
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र ते पाहील, जे या राज्यानं अगोदर कधीही पाहिलं नाही. पवार विरुद्ध पवार असा सामना.
राजकारणाच्या पटलावर नात्यांची ती लढाई, जिची कल्पना काही महिन्यांपूर्वी इथं कधीही शक्य नव्हती.
कधी मुंडे कुटुंबात, कधी ठाकरे कुटुंबात, अशा राजकारणातल्या घराण्यांच्या वाटेला जे आलं, ते एकसंध पवार कुटुंबात कधीही होणार नाही, जे जणू सगळ्यांना माहीत होतं. पण तसं झालं नाही. ही निवडणूक त्या दृष्टीने इतिहासातली गृहीतकं चूक ठरवणारी, अशी ऐतिहासिक ठरणार आहे. बारामती, जी केवळ गेली पाच दशकं पवारांच्या नावानं ओळखली जाते, तिथे पवारांच्याच घरातले प्रतिस्पर्धी समोरासमोर उभे आहेत.
सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार. ही लढाई मुलगी विरुद्ध सून आहे, की भावजय विरुद्ध नणंद आहे, की राष्ट्रवादीचा एक गट विरुद्ध दुसरा गट आहे की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे ? यापैकी कोणत्याही पर्यायाचा निवड केला तरीही, मूळ लढाई ही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे. काका विरुद्ध पुतण्या. एकाच घरातल्या दोन पिढ्यांची लढाई.
गेली अनेक वर्ष महाराष्ट्राचं राजकारण हे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाभोवती फिरत राहिलंय. पण तरीही या कुटुंबाचं वैशिष्ट्य हे की ते नात्यांपासून राजकारण कायम बाजूला ठेवू शकले. वैचारिक मतभेद असतीलच तरी नात्यांमध्ये ते येत नाहीत. स्वत: शरद पवार त्यांचं स्वत:चं उदाहरण कायम सांगतात.
त्यांच्या आई शारदाबाई पवार या त्या काळी शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराच्या होत्या. घरातले इतरही. आई स्वत: जिल्हा बोर्डावर निवडून गेलेल्या. पण शरद पवार हे तरुणपणापासून कॉंग्रेसकडे ओढले गेले. यशवंतराव चव्हाणांचा प्रभाव पडलेला. त्यामुळे ते कॉंग्रेसकडून पहिली निवडणूक लढले.
याच कुटुंबातलं दुसरं उदाहरण म्हणजे एन.डी.पाटील यांचं. ते शरद पवार यांच्या भगिनी सरोज यांचे पती. तेही 'शेकाप'मधे होते. त्यांचं आणि पवारांचं राजकारण वेगवेगळं. एका टप्प्यावर दोघे विधिमंडळात परस्परविरोधी बाकांवर होते. पण कौटुंबिक नाती राजकारणात वा राजकारण नात्यांच्या आड आलं नाही.
हे पुढच्याही पिढ्यांमध्ये चालू राहिलं. सणसमारंभ आजही तीन पिढ्या एकत्रित येऊन साजरे करतात, कुटुंबातील मतभेद हे कुटुंबात सोडवले जातात यावर असंख्य बोललं गेलं. वाद झाले नाहीत असं नाही, पण ते कुटुंबातूनच सोडवलेही गेले. सगळ्यात जवळचं उदाहरण 2019 चं. अजित पवार तडकाफडकी भाजपासोबत आघाडी करायला गेले. शपथविधी झाला. पण अवघ्या 80 तासांत सरकार पडलं आणि अजित पवार स्वगृहीसुद्धा परतले. त्यावेळेस अशी चर्चा होती की शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही अजित पवारांना परत आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. अर्थात या चर्चेची पुष्टी पवार कुटुंबीयांकडून कधी झाली नाही.
राजकारणाबद्दलची ही कौटुंबिक तटस्थता अगदी अजित पवारांच्या दुसऱ्या बंडानंतरही दिसली. ते महायुतीत सामील झाले, शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षावर त्यांनी दावाही सांगितला आणि मिळवलाही. त्या दरम्यान दिवाळी आली आणि सगळ्यांनाच प्रश्न पडला की दिवाळीत एवढी वर्षं एकत्र दिसणारं पवार कुटुंब यावेळेस संपूर्ण दिसणार नाही का? पण तसं झालं नाही. याही वेळेस पवार कुटुंबाची एकत्रित दिवाळी झाली. भाऊबीजेला अजित पवारांना ओवाळतानाचे सुप्रिया सुळेंचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आणि त्यानंतर अजित पवार मोदींच्या भेटीला गेले.
पण ही तटस्थता सुनेत्रा पवारांच्या बारामतीच्या उमेदवारीनंतर मात्र संपली, असं दिसतं आहे. नाती राजकारणात मिसळली. जो मतदारसंघ अगोदर घरातल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अलगद आला, आता त्याच्यासाठी एका पिढीतल्या दोन व्यक्ती समोरासमोर उभ्या राहिल्या. आणि केवळ या दोघीच निवडणुकीला समोरसमोर आहेत असं असतं तर गोष्ट वेगळी. पण कुटुंबातल्या सदस्यांची जाहीर वक्तव्यं, त्यांचं एक बाजू घेणं हे घडल्यावर याला हे केवळ व्यवहारापुरतं राजकारण आहे, असं चित्र नाही.
कुटुंबीयांनी जाहीर बाजू घेतल्या. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी एका व्हिडिओमध्ये, जेव्हा अजित पवार राजकारणात आले होते तेव्हा त्यांच्या पिढीत काय ठरलं होतं, हे सगळ्यांना सांगितलं. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी काटेवाडीच्या ग्रामस्थांसमोर केलेलं भाषण सर्वदूर पसरलं. हा संघर्ष केवळ 'शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण' या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या जुन्या प्रश्नापर्यंतच मर्यादित राहिला नाही. तो अजित पवार विरुद्ध शरद पवार असा बनला आहे आणि एका पिढीचं राजकारण संपेल अशा टप्प्यावर पोहोचला आहे. हा संघर्ष भावनिकही बनला. 'खऱ्या पवार कोण? कोण आतलं कोण बाहेरुन आलेलं' इथपर्यंत तो वैयक्तिक बनला. सुनेत्रा पवारांचं डोळे टिपणं आणि शरद पवारांचं या विषयावर स्पष्टीकरण, यातच वातावरणाची धग जाणवली.
आता निवडणुकीत समोरासमोर पवारांची तिसऱ्या पिढी आजे. पण त्याचे परिणाम राजकारणात आलेल्या वा येण्याची तयारी करण्याऱ्या पवारांच्या चौथ्या पिढीवरही होत आहेत. तेही मैदानात उतरले आहेत. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार एका बाजूला, पण त्यांचे सख्खे चुलत बंधू युगेंद्र पवार आजोबा शरद पवारांकडे. रोहित पवार अगोदरच त्या बाजूला उभे आहेत. यामुळे पवार घराण्याच्या चौथ्या पिढीला या राजकीय संघर्षाबाबत काय वाटतं? एकत्रित वाढलेल्या या भावंडांवर एका राजकीय निर्णयाचा काय परिणाम झाला? याचा घेतलेला हा आढावा..
'माझ्या निवडणुकीत मतं न मिळण्यासाठी प्रयत्न झाले'
कुटुंबातला संघर्ष या निवडणुकीत दिसतो आहे तरीही त्याचे पडसाद 2019 च्या गेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच पडू लागल्याचे दिसतात. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी 2019 साली मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यांना उमेदवारी द्यावी की न द्यावी यावरुन पक्षातही दोन गट होते. चौथ्या पिढीतले रोहित पवार राजकारणात सक्रिय झाले होते. पवारांच्या पुढच्या पिढीचे राजकारणातले प्रतिनिधी ते असतील अशी चर्चा रंगू लागली होती. पुढे विधानसभा निवडणुकीत ते कर्जत-जामखेडमधून जिंकलेही. पण त्या अगोदर राजकारणात फारशा सक्रिय नसणा-या पार्थ पवारांचं नाव लोकसभा निवडणुकीसाठी पुढे आलं. पार्थ पवार यांना उमेदवारी देताना, "सर्व तिकीटं घरातच दिली तर कार्यकर्त्यांनी काय करायचं?" हे विधान शरद पवार यांनी जाहीरपणे केलं होतं. तेव्हा राज्यसभेचे खासदार असलेले शरद पवार पुन्हा माढ्यातून निवडणुकीला उभे राहतील का अशी चर्चा सुरू झाली होती. पण ते निवडणुकीत उतरले नाहीत. तेव्हा कुटुंबातही यावर चर्चा झाली आणि पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली. पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील अनेक सदस्य प्रचारात उतरले होते. पण त्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पुढचे काही वर्ष पार्थ पवार हे राजकारणात फार सक्रीय दिसले नाहीत. जणू राजकारणापासून ते लांब गेले.
आता सुनेत्रा पवारांच्या निवडणुकीतील पडद्यामागची जबाबदारी पार्थ पवार पार पाडत आहेत. पण याआधीचे पाच वर्षं ते कुठे होते? आताच्या राजकीय संघर्षाबाबत बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सविस्तर भाष्य केलं. त्यांच्या कुटुंबीयांविषयीच्या त्यातल्या वक्तव्यांवरुन राजकारणामुळे कसं अंतर्गत वातावरण बदलत होतं हे जाणवतं.
पार्थ पवार सांगतात, "मी उमेदवार होतो. माझ्या प्रचारासाठी पूर्ण पवार कुटुंब उतरलं होतं हे खरंय पण ते मनापासून उतरलं होतं का? तर मला नाही वाटत. एक असतं की, आपण प्रत्यक्षात मदत करतो आणि दुसरं मदत केल्याचं दाखवून एखाद्याला मतं कशी नाही मिळाली पाहिजे. बंडखोरी झाली पाहिजे हे बघतो.
"माझ्या बाबतीत तसं झालं. कार्यकर्त्यांनी खरंच माझ्यासाठी काम केलं. पण काही लोकांनी काम करतोय हे दाखवून खंजिर खुपसण्याचं काम केलं. माझ्या निवडणूकीत ज्या कमतरता राहिल्या त्या आईच्या निवडणूकीत राहू नये याकडे मी आता जातीने लक्ष देतोय,"
कुटुंबातील सदस्यांकडून पार्थ पवारांना पाडण्याचं काम झालं का? यावर त्यांनी भाष्य करणं टाळलं. मग अजित पवारांच्या इतके जवळ असलेले बंधू श्रीनिवास पवार त्यांच्या विरोधात का उभे राहिले? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
पार्थ पवार याबाबत बोलताना पुढे सांगतात, "कोणी निर्णय घेतला तर आम्ही विचारत नाही. मुळात ते काही मनापासून साहेबांबरोबर उतरलेले नाहीत. त्यांच्या राजकीय भविष्यांची चिंता करून ते उतरले आहेत. त्यांना राजकीय इच्छाशक्ती आहे. त्यासाठी शरद पवारांसोबत आहेत. राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार कुटुंब सोडलं तर कोणीही सुनेत्रा पवारांच्या विरोधात प्रचारात उतरलेलं नाही. दोन कुटुंब म्हणजे पवार कुटुंब नाही. पवार कुटुंब हे खूप मोठं आहे. आमच्या बाजूने आमच्या आत्या आहेत. आमचं कुटुंब आहे. हे चित्र जे दाखवलं जातंय ते चुकीचं आहे."
राजकीय भूमिका बदलल्या तरी पवार कुटुंब एकत्र होतं. त्यात पार्थ पवार हे सुप्रिया सुळेंचे लाडके मानले जायचे. आज त्याच आत्याच्या विरोधात ते प्रचार करतायेत. पण मला सुप्रिया आत्याने सांगितल्याप्रमाणे मी वागतोय असं पार्थ सांगतात.
"सुप्रिया आत्याने मला कायम सांगितलं कधीही वडिलांची साथ सोडायची नाही. त्या त्यांच्या वडिलांची साथ देतायेत आणि मी माझ्या वडिलांची…"
कुटुंबातील राजकीय संघर्षाचा परिणाम चुलत भावंडासोबतच्या नात्यांवर झाल्याच्या बाबतीत ते पुढे सांगतात, "आम्ही भावंडं एकत्र वाढलो. आमचं एकमेकांशी चांगला संवाद असला तरी आता वेगळे राजकीय विचार घेऊन पुढे चाललो आहे. दोन्हीकडचे विचार आता वेगळे झाले आहेत, ध्येय वेगळे, राजकीय पक्ष वेगळे त्यामुळे विषय संपला."
'जर पवार घरातला उमेदवार नसता तर परिस्थिती वेगळी असती'
श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे भाऊ आहेत. 2019 साली अजित पवार यांनी भाजपबरोबर जाऊन पहाटेचा शपथविधी केला. त्यानंतर ते भाऊ श्रीनिवास पवारांच्या घरी होते. तेव्हा श्रीनिवास पवारही अजित पवार यांच्यासोबत होते. पण श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार तेव्हा शरद पवार यांच्यासोबत होते. आजही युगेंद्र पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारात सक्रिय दिसतायेत. युगेंद्र पवार हे शरद पवारांबरोबर MORFA या शेतकऱ्यांसाठी असलेल्या संस्थेचं काम पाहतात. युगेंद्र यांनी आपल्या सख्ख्या काकांच्या विरोधात भूमिका का घेतली? पार्थ पवार म्हणतात तसं युगेंद्र पवार यांना राजकीय इच्छाशक्ती आहे म्हणून ते शरद पवारांची साथ देत आहेत का? हे प्रश्न पार्थ पवारांशी बोलल्यानंतर पडतात. युगेंद्र पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना या प्रश्नांवर सविस्तर भाष्य केलं.
युगेंद्र पवार सांगतात, "प्रत्येक निवडणुकीत मी प्रचार केला आहे. लहान असल्यापासून मी प्रचार करायचो. दहा बारा वर्षांचा होतो तेव्हापासून मी प्रचार केला आहे. मी आणि जय पवार दोघंही 'डोअर टू डोअर' फिरायचो. मागच्या निवडणुकीतही प्रचार केला आहे. तेव्हा दादांचा प्रचार करायचो. आमचे फोटोही आहेत. सर्वांना माहिती आहे. पार्थ पवारांचाही मी प्रचार केला आहे. आम्ही एकत्र कामं केली आहेत. माझ्याकडे जुने फोटो आहेत.
"आमचं कुटुंब निवडणुकीत कायम उतरतं. पार्थ दादा म्हणतो तसं मनापासून प्रचार नाही केला म्हणजे काय केलं? सर्व कुटुंबाने एकत्रित येऊन त्याचा प्रचार केला आहे. मला किंवा माझ्या कुटुंबाला राजकीय इच्छाशक्ती असती तर, आम्ही कधीच तिकीट मागितलं असतं," युगेंद्र पवार सांगतात. यापुढे राजकारणात येणार की नाही याबाबत अजून विचार केला नसल्याचं युगेंद्र पवार सांगतात. मग कायम अजित पवार यांच्यासोबत राहीलेले श्रीनिवास पवार अचानक अजित पवारांच्या विरोधात का गेले? याला नेमकं काय कारण आहे? हे अजूनही कोणी स्पष्ट केलं नाही. युगेंद्र पवार यावर अधिक भाष्य करताना म्हणतात, "लहानपणापासून मी शरद पवारांच्या जवळ आहे. माझे वडील श्रीनिवास पवार हे अजित दादांना म्हणाले की, घरातला उमेदवार नका देऊ. जिंकले तरी पवार जिंकतील आणि हरले तरी पवार. असं केलं तर कुटुंबावर त्याचा परिणाम होईल. पण दादांनी ऐकलं नाही.
सर्व गोष्टी एका बाजूने नाही होऊ शकत ना. माझे वडील प्रतिभा काकींच्या खूप जवळ आहेत. अनंतराव पवार माझे आजोबा हे खूप लवकर गेले. तेव्हा साहेबांनी आणि प्रतिभा काकींनी या सर्वांना मुंबईत आणलं. काटा चमचा कसा धरायचा इथपासून त्यांना शिकवलं आहे. या वयात त्यांना सोडणं माझ्या वडिलांना पटलं नाही."
जर कुटुंबातील उमेदवार नसता तर परिस्थिती वेगळी असती आणि कुटुंबात फूट पडली नसती?
युगेंद्र पवार सांगतात, "शंभर टक्के वेगळी असती. मागच्या दिवाळीला आम्ही सगळे एकत्र होतोच ना.. तेव्हा पण दादा भाजपबरोबर गेले होतेच. आमच्या पणजी शारदाबाई पवार 'शेकाप'च्या विचारांच्या होत्या. साहेबांचे मोठे भाऊ 'शेकापंमधून खासदारकीला उभे राहिले आहेत. एन.डी पाटील यांनी इतकी टोकाची भूमिका कायम घेतली.
"ते पवार कुटुंबाचे जावई होते. पण त्याचा नात्यावर परिणाम नाही झाला. मग हे सुद्धा स्वीकारलं असतं. पण पवार विरुद्ध पवार हा संघर्ष टाळायला हवा होता." हे झाले राजकीय भूमिकांमुळे झालेले मतभेद. पण या राजकीय मतभेदांचा परिणाम नातेसंबंधांवरही झालेला दिसतोय. तसं पार्थ पवारांनी बोलूनही दाखवलं. पण युगेंद्र पवार आमचं सगळ्यांबरोबर नातं चांगलं असल्याचं सांगतात. "पार्थ दादा, रोहित दादा असेल. आमचं लहानपण एकत्र गेलं आहे. पण आता सर्वांनी राजकीय भूमिका वेगळ्या घेतल्या आहेत. पण त्यावर परिणाम माझ्या बाजूने तरी होणार नाही. त्यांच्या बाजूचं सांगता येत नाही. पर्सनल आणि प्रोफेशनल जर सर्वांनी 'मिक्स' केलं तर पुढे कसं जायचं? आम्ही तिथेच आहोत तुम्ही दुसरी भूमिका घेतली.
"आम्ही कुठेही गेलो नाही आणि जाणारही नाही. मी तरी अपेक्षा ठेवेन की कुटुंब तसंच राहील. मला नाही वाटत कोणी राजकारण आमच्या नात्यात आणेल आणि फूट पाडू शकेल," युगेंद्र म्हणतात.
कसं आहे पवार कुटुंब?
गोविंद पवार आणि शारदाबाई पवार यांचं 11 मुलांचं कुटुंब. यात 7 मुलं आणि 4 मुली होत्या.
पवार घराण्यातून राजकारणात आलेले शरद पवार हे एकटेच होते. राजकारणात त्यांनी मोठी झेप घेतली. शरद पवारांच्या भावंडांमध्ये वसंतराव पवार हे ख्यातनाम वकील होते, आप्पासाहेब पवार हे शेतीमध्ये अग्रेसर होते, माधवराव पवार हे व्यवसायिक होते, सूर्यकांत पवार हे नगर रचनाकार होते आणि प्रतापराव पवार हे इंजिनिअर आणि वृत्तपत्र व्यवसायात होते. अनंतराव शेती करायचे. शरद पवारांच्या बहिणी लग्नानंतर त्यांच्या कुटुंबात व्यस्त झाल्या.
पुढे दुसऱ्या पिढीतील अनंतराव पवारांचे चिरंजीव अजित पवार हे सहकार राजकारणातून हळूहळू पुढे आले. शरद पवारांसोबत ते काम करू लागले. 1991 पासून हे संसदीय राजकारणात आले तेव्हा ते लोकसभेत खासदार म्हणून मोजक्या काळासाठी गेले. पुढे शरद पवारांनी कायमस्वरूपी राष्ट्रीय राजकारणात जाण्याचं ठरवल्यानंतर त्यांनी अगोदर इतके वर्षं प्रतिनिधित्व केलेला बारामती विधानसभा मतदारसंघ 1995 पासून अजित पवारांचाच झाला. तीन दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात घालवला.
2005 पासून सुप्रिया सुळे यांनी राजकारणात लक्ष घालायला सुरू केलं. जवळपास 18 वर्षं त्या राजकारणात आहेत. सलग तीन वेळा त्या बारामतीतून खासदार झाल्या आहेत. पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीतील अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघंच राजकीय क्षेत्रात काम करत होते. 2017 साली आप्पासाहेब पवार यांचे नातू रोहित पवार यांनी जिल्हा परिषद लढवली. त्यानंतर 2019 साली ते आमदार झाले. रोहित पवारांच्या निमित्ताने पवारांची चौथी पिढीने राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर 2019 साली अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला. आता पार्थ पवार हे सुनेत्रा पवारांच्या निवडणुकीचं काम करत आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. पवार कुटुंब हे पूर्वीपासून एकत्र होतं. पण राजकारणातली अभिलाषा, त्यावरुन धुसफूस होतीच आता फक्त अजित पवारांच्या भूमिकेमुळे ती जाहीरपणे समोर आली असं बारामतीतील राजकीय विश्लेषक सांगतात.
'पूर्वी पवार कुटुंब एकमेकांवर बोलणं टाळायचे. पण आता अजित पवारांना त्यांचे कार्यकर्ते टिकवण्यासाठी कुटुंबाबाबत बोलावं लागतंय. कुटुंबात ही फूट पडली असली तरी भविष्यात ही फूट तशीच राहील आणि पुन्हा कुटुंब एकत्र येणार नाही यांचा अंदाज लावणं पवार कुटुंबाबत धाडसाचं ठरेल. राजकारणात काहीही शक्य आहे,' असं एक जुने पत्रकार सांगतात.