सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी नार्वेकर यांच्या भूमिकेला आक्षेप घेत निषेध केला आहे. अलिबागचे नाव बदलाची गरज नाही आणि बदलायचे असेल तर सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नावाचा विचार प्राधान्याने व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केली. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनीही नार्वेकरांच्या मागणीचा निषेध केला. नार्वेकरांची नामांतराची मागणी चुकीची असून त्यांचा विरोध व्हायलाच हवा. मुळात अलिबागकरांनी नामांतराबाबत मागणी केलेली नाही. अशावेळी नार्वेकरांनी नामांतराची मागणी करण्याची गरजच नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
अलिबागमध्ये नाक खुपसायची राहुल नार्वेकर यांना गरज काय? असा सवाल अलिबागचे माजी नगरसेवक अमर वार्डे यांनी उपस्थित केला. नार्वेकर निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अलिबाग मधील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आधी अलिबागचा इतिहास समजून घेणे गरजेच आहे. तर कलियुगातील रामशास्त्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल नार्वेकर यांनी अलिबाग शहराच्या नामकरणात नारदाची भूमिका बजावू नये असा टोला काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष योगश मगर यांनी लगावला आहे. अलिबागचे नाव आहे तेच चांगले आहे बदलण्याची गरज नाही असे ते म्हणाले. समाज माध्यमांवरही नार्वेकर यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रीया येत असून, त्यांच्या मागणीचा निषेध केला जात आहे. दरम्यान समाज माध्यमांवर ‘आय लव अलिबाग’ हा ट्रेण्ड चालवला जात आहे.