yuva MAharashtra आ. विश्वजीत कदम यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते पै. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रिय !

आ. विश्वजीत कदम यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते पै. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रिय !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२८ एप्रिल २०२४
उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात परस्पर उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस व ठाकरे शिवसेनेत बरेच दिवस 'तू तू - मैं मैं' सुरू होते. सांगली येथे काँग्रेसचा मेळावा घेऊन विश्वजीत कदम यांच्यासह राज्य पातळीवरील नेत्यांनी ठाकरे यांच्या आगळकीबाबत नाराजी ही व्यक्त केली होती. त्यामुळे महाआघाडीत बिघाडी झाल्याची चिन्हे, मतदानाचा दिवस जवळ येत असतानाही दिसून येत होती.
परंतु अखेर आज महाआघाडीतील घटक पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीने महा आघाडीचे धर्मपालन करून प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेतला. काँग्रेस नेते, आमदार विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, शरद लाड हे सर्वजण चंद्रहार पाटील यांच्यासोबत पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात आज (28 एप्रिल) प्रचारात उतरले. त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात आता रंगत आली आहे.


आज पलूस कडेगाव मतदारसंघांमध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते तसेच गेल्या काही दिवसांपासून विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी ताकतीने प्रयत्न करणारे आमदार विश्वजित कदम एकत्र आले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी आता महाविकास आघाडीचे मनोमिलन झाल्याची चर्चा आहे. प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर आमदार विश्वजित कदम म्हणाले की, गावोगावी भेटी देणं हाच प्राधान्य क्रम आहे. उन्हाची तीव्रता पाहता उमेदवारांकडून भेटीगाठींवर भर सुरू आहे. ते पुढे म्हणाले की, या चंद्रहार पाटील हे शेतकरी कुटुंबातील आहेत. सध्या ते राजकारणामध्ये उतरले आहेत.

विश्वजित कदम तिरंगी लढतीवर काय म्हणाले ?

सांगली लोकसभेला होत असलेल्या तिरंगी लढतीवर बोलताना कदम यांनी सांगितले की, पूर्वीच्या दोन्ही उमेदवारांबाबत काहीतरी विषय आहेत. मात्र, हा नवखा उमेदवार आहे, त्यांचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे येणारा काळ ठरवेल. जनता त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसत असल्याचे कदम यांनी सांगितले.