सांगली समाचार - दि ७ एप्रिल २०२४
सांगली - उमेदवारीवरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेले महाविकास आघाडीतील द्वंद चार हात दूर राहून पाहणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अखेरच्या टप्प्यात या मैदानात उतरला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्यापासून ते अगदी दोन दिवसांच्या खासदार संजय राऊत यांच्या दौर्यापर्यंत राष्ट्रवादी अलिप्त होती. दोघांच्या वादात जो कुणी मैदानात राहील त्याची पाठराखण करण्याची मानसिकताही करण्यात आली असताना अचानकपणे खासदार सांगलीहून प्रस्थान करताना त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घााईगडबडीने का पोहोचले याचे उत्तर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी मतदारांना लिहिलेल्या पत्रात असल्याचे मानले जात आहे. खासदार राऊत यांची झालेली राजकीय कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला तो राष्ट्रवादीनेच मात्र, यामागील राजकीय गणितेच वेगळी असल्याचे मानले जात आहे.
खासदार राऊत दोन दिवसांच्या सांगली दौर्यावर आले होते. निवडणुकीची रणनीती उमेदवार चंद्रहार पाटील यांना सोबत घेऊन निश्चित करत असताना त्यांच्या दौर्यामध्ये महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्ष सहभागी व्हावेत अशी अपेक्षा होती. मात्र, सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रयत्नशील असल्याने व काँंग्रेस शिवसेनेला राजकीय स्पर्धक मानत असल्याने खासदार राऊत यांच्या सांगली दौर्यात सहभागी होणेच अशक्य होते. मात्र, दुसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला राऊत यांच्या दौर्यात सहभागी होण्यामुळे कोणीही दुषणे दिली नसती, आणि त्याला आक्षेपही घेण्याचे काहीच कारण नव्हते. तरीही स्थानिक परिस्थितीचा विचार करून राष्ट्रवादीनेही शिवसेनेच्या दौर्यापासून अलिप्त राहण्याचीच भूमिका घेतली. उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्यावर काँग्रेसने तर बहिष्कारच टाकत असल्याचे जाहीर केले होते. मात्र राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत कोणतीही प्रतिक्रिया न देता स्वत:ला या मेळाव्यापासून दूरच ठेवले. उमेदवारीचा निर्णय लागल्यानंतरच कोणाच्या पाठीशी राहायचे हे ठरवता येईल असा धूर्तपणा यामागे होता.
मात्र, खासदार राऊत मतदारसंघाचा दौरा आटोपून कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजीसाठी प्रस्थान करायच्या तयारीत असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते खासदार राऊत यांच्या भेटीसाठी घाईगडबडीने गेले. तत्पुर्वी झालेल्या पत्रकार बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना उमेदवाराची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम राज्यातील ४८ मतदारसंघांत दिसतील असा इशाराही दिला होता. यामुळे या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजणे सहाजिकच आहे. मात्र, शिवसेनेच्या इशार्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खासदार राऊत यांच्या भेटीला गेले असे समजणे भाबडेपणा ठरेल. याला कारण ठरले ते विशाल पाटील यांनी शनिवारीच कार्यकर्त्यांना उद्देशून प्रसारित केलेले पत्र कारणीभूत आहे. या पत्रात आता लढायचं आणि जिंकायचं असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे. त्यालाही राष्ट्रवादीचा आक्षेप असण्याचे कारण नाही. कारण कार्यकर्ते सैरभैर होऊ नयेत, अन्य पक्षांच्या गळाला लागू नयेत या हेतूने हे पत्र लिहिले असले तरी या पत्रातील मजकुरावरून वाद निर्माण होऊ लागला आहे. सांगलीच्या जागेवर काँग्रेसचाच हक्क आहे हे सांगत असताना वसंतदादा, पतंगराव कदम, आर. आर. आबा, गुलाबराव पाटील, मदन पाटील, शिवाजीराव देशमुख, प्रकाशबापू पाटील आदी दिवंगत नेत्यांचा उल्लेख करत सांगलीच्या विकासात योगदान देण्यात काँग्रेसचा पुढाकार असल्याची आठवण करून देण्यात आली आहे.
मात्र, या दिवंगत नेत्यांचे स्मरण करत असताना स्व. राजारामबापू पाटील यांचे नाव घेण्यात आलेले नाही. यामुळेच राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर उमटला असून त्यातूनच खासदार राऊत यांची भेट घेऊन आघाडी धर्म पालनाची आठवण झाली असावी, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दादा-बापू वाद आता चार दशकानंतरही राजकीय क्षेत्रात प्रभावशाली ठरत आहे. सांगलीच्या संथ वाहणार्या कृष्णेच्या महापुरातही हा वाद वाहून गेला नाही, अथवा औदुंबरच्या डोहातही बुडालेला नाही हेच यावरून स्पष्ट होते.