Sangli Samachar

The Janshakti News

एकजण डोक्यानं तर एकजण मातीतली कुस्ती करणारा - संजयकाका



सांगली समाचार दि. ११ एप्रिल २०२४
सांगली - एक डोक्यानं कुस्ती खेळणार आणि एक मातीतली कुस्ती खेळणार, असं म्हणत भाजपचे सांगलीतील उमेदवार संजयकाका पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे म उमेदवार चंद्रहार पाटील आणि सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार विशाल पाटलांना चिमटा काढला आहे. सांगलीत रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सांगली लोकसभेचे सर्व उमेदवार उपस्थित होते. त्यावेळी संजयकाका पाटलांनी चंद्रहार पाटील आणि विशाल पाटलांना चिमटा काढला. 


रमजान ईदनिमित्त सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी भर मंचावरुन एक टोला महाविकास आघाडीला लगावला आहे. संजयकाका पाटील यांनी चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांना उद्देशुन एक वक्तव्य केलं आहे. एक डोक्यानं कुस्ती करणार आणि एक मातीतली कुस्तीत करणार, असा टोला मारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. यावेळी तिघांनीही मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा देत एकप्रकारे आपआपला प्रचार केला. यावेळी हजारो मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर एकत्र आले होते. यासाठी इदगाह कमिटीने चोख व्यवस्था केली होती. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांगली शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद उत्साहात साजरा करण्यात आला. रमजान ईद निमित्त सांगलीच्या जुना बुधगाव रोडवरील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करत रमजान ईदची दुवा अदा केली. यावेळी मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सांगली लोकसभेचे सर्व उमेदवार उपस्थित होते. भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील, मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील, काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले विशाल पाटील उपस्थित होते. 

सांगलीवरुन महाविकास आघाडीत सध्या धुसफूस सुरू आहे. सांगलीमधील उमेदवाराची शिवसेना ठाकरे गटानं थेट घोषणा केली. त्यावरुन सांगलीतील वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपनं लोकसभेच्या रिंगणात संजयकाका पाटलांना उतरवलं आहे. तर शिवसेना ठाकरे गटानं चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावरुन काँग्रेसकडून इच्छुक असलेले उमेदवार विशाल पाटील नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.