सांगली समाचार - दि. ११ एप्रिल २०२४
नवी दिल्ली : 'इतिहासाबाबतची समान जाणीव' आणि 'भविष्याबाबतचा समान दृष्टीकोन' असलेल्या व्यक्तीच 'राष्ट्रीयत्व' निर्माण करतात, असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी बुधवारी व्यक्त केले. प्राचीन भारतीय इतिहासाचे विविध टप्पे आणि तेव्हाची भारतीयांची कामगिरी यावर आधारलेल्या ११ खंडांचे प्रकाशन दोवाल यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
विवेकानंद इंटरनॅशनल फौंडेशन आणि आर्यन बुक्स यांनी 'हिस्टरी ऑफ ॲन्शिएंट इंडिया'चे हे ११ खंड प्रकाशित केले आहेत. यामध्ये अनेक विचारवंतांचे अभ्यासपूर्ण लेख असल्याचे प्रकाशकांनी सांगितले. 'प्रागैतिहासिक मूळ' नावाच्या पहिल्या खंडामध्ये प्राचीन काळातील विविध प्रकारची माहिती देण्यात आली आहे. तर सहावा खंड भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र यांच्याबाबत माहिती सांगणारा आहे.
अजित दोवाल म्हणाले,''इतिहासातील एकाच घटनेबाबत तुमचा आणि माझा दृष्टीकोन वेगवेगळा असेल तर आपण दोघे एकत्र येऊन देश निर्माण करू शकत नाहीत. भारत ही एक प्राचीन संस्कृती आहे. त्याचवेळी ती हजारो वर्षांपासून चालत आलेलीही संस्कृती आहे. भारतीय इतिहासाबाबत विदेशांतील पुस्तकांमधील पहिले प्रकरण अलेक्झांडरपासूनच सुरू होते, हा विरोधाभास आहे.''
या खंडनिर्मितीच्या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष एस. गुरुमूर्ती यांच्याबरोबर झालेल्या चर्चेची आठवण दोवाल यांनी सांगितली. 'केवळ देशवासीयांनाच नाही, तर येणाऱ्या पिढ्यांनाही 'ओळख आणि अभिमान' यांच्याबाबतची नवी जाणीव देऊ शकेल, असा नवा विचार देण्याबाबत चर्चा झाली.
स्व-प्रतिमा आणि स्व-ओळख यांचा आपला इतिहासाबाबतचा आणि स्वत:बाबतचा दृष्टीकोन कसा आहे, याच्याशी निकटचा संबंध असतो,' असे दोवाल म्हणाले. अकरा खंडांची ही मालिका म्हणजे प्रकल्पाची अखेर नसून अंतिम ध्येयाकडे जाण्याचे साधन आहे असे सांगत दोवाल यांनी, 'हे अंतिम ध्येय म्हणजे समान वारशाबाबतची जाणीव, समान इतिहास, पूर्वजांच्या कामगिरीचा अभिमान आणि भविष्याबाबतचा समान विचार या आधारावर राष्ट्रनिर्मिती करणे,' असे असल्याचे प्रतिपादन केले.