yuva MAharashtra प्रभू रामाचे वंशज आजही जिवंत ? या राज्याच्या राजकारणात सक्रिय

प्रभू रामाचे वंशज आजही जिवंत ? या राज्याच्या राजकारणात सक्रिय



| सांगली समाचार वृत्त |
जयपूर - दि.१७ एप्रिल २०२४
आज श्री राम नवमी... प्रभू श्रीराम यांचा विषय निघाला की अनेकांना प्रश्न पडतो की त्यांचे वंशज आता आहेत का ? ते कुठे आहेत, काय करतात? याबाबत जाणून घेऊ या. आज रामाचे वंशज अयोध्येपासून सुमारे 700 किमी दूर असलेल्या राजस्थानची राजधानीच्या शहरात म्हणजे जयपूर इथं राहतात. राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी दावा केला आहे, की त्या आणि त्यांचं कुटुंब भगवान रामाचे वंशज आहेत.

दिया कुमारी यांचा दावा

राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि भाजप नेत्या दिया कुमारी यांनी दावा केला आहे, की जयपूर राजघराणं रघुकुल कुटुंबाचा एक भाग आहे. म्हणजेच ते प्रभू रामाचे वंशज आहेत. भगवान श्रीरामांना दोन पुत्र होते. एक लव आणि दुसरे कुश. जयपूर राजघराणं कुशचे वंशज असल्याचा दावा दिया कुमारी यांनी केला आहे. दिया यांचे वडील प्रभू श्री राम यांची 309 वी पिढी होती आणि त्या 310 व्या पिढीतल्या आहेत, असं त्या म्हणाल्या आहेत. प्रभू रामाचे जगभर अनेक वंशज आहेत.

दिया कुमारी यांच्या मते, त्या लहानपणापासूनच ऐकत आल्या आहेत, की त्यांचं कुटुंब हे रामाचं वंशज आहे. दिया यांनी असाही दावा केला, की गुगलवर कछवाहाची वंशावळ आहे, त्यानुसार त्यांचं कुटुंब श्री रामाचं वंशज आहे. याशिवाय जयपूर राजघराण्याच्या पोथीखान्यात आणि संग्रहालयात यासंबंधीचे पुरावे देणारी कागदपत्रं आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. 'राठोड' राजपूत हे प्रभू रामाचे पुत्र लव यांचे वंशज आहेत, असा त्यांचा दावा आहे.


कोण आहेत दिया कुमारी ?

दिया कुमारी राजस्थानच्या राजकारणात अगदी कमी काळात नावारूपास आल्या. 2018मध्ये त्या सवाई माधोपूरमधून आमदार झाल्या. त्यानंतर 2019मध्ये त्या राजसमंदमधून खासदार झाल्या. 2023 मध्ये जयपूरच्या विद्याधर नगर मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या. पक्षाने त्यांना राज्याचं उपमुख्यमंत्रिपद दिलं. सीएम भजनलाल शर्मा यांच्यानंतर त्या राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात.