Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीचा गड राखण्यासाठी विशाल पाटलांनी रणशिंग फुंकले...



सांगली समाचार - दि. ६ एप्रिल २०२४
सांगली - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत. अशातच काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी सांगली काँग्रेसचीच आहे, हा गड लढवायचा आणि जिंकायचाच असे म्हटलं आहे. सांगली ही काँग्रेसचीच असून, ती आपण सोडायची नाही असं विशाल पाटील यांनी म्हटलंय. यावरून विशाल पाटील हे एक तर काँग्रेसतर्फे मैत्रीपूर्ण लढतीसाठी मैदानात उतरतील किंवा अपक्ष म्हणून तरी याचे संकेत मिळत आहेत.

विशाल पाटील यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय ?

मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहोत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्यामुळं सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झाल्याचे विशाल पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नातं 

स्व. वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम साहेब, स्व. गुलाबराव पाटील साहेब, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व. आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे तुम्हाला ठाऊकच आहे. त्यामुळं काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नातं तयार झालं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मा. विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत असल्याचे विशाल पाटील म्हणाले.

उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल 

या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे की, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री असल्याचे विशाल पाटील म्हणाले. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू असं पोस्टमध्ये विशाल पाटलांनी म्हटलंय.