yuva MAharashtra भाजपच्या नगरसेवकांचं बंड, ना. सुरेशभाऊंची शिष्ठाई निष्फळ

भाजपच्या नगरसेवकांचं बंड, ना. सुरेशभाऊंची शिष्ठाई निष्फळ



| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि.१८ एप्रिल २०२४
सांगलीत भाजपला मोठा धक्का बसला असून मिरजेतील भाजपच्या नगरसेवकांनी भाजपचे खासदार संजय पाटील यांचा प्रचार करण्यास नकार दिला असून काँग्रेसच्या विशाल पाटलांना मदत करण्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्राचे कामगार मंत्री व सांगलीचे पालकमंत्री ना. सुरेश भाऊ खाडे यांनी याबाबत मध्यस्थी करून सर्वांना संजय काकांचा प्रचार करण्याचे आवाहन केले परंतु वरील भाजप नगरसेवकांनी स्पष्ट शब्दात याला नकार दिल्याने ना सुरेश भाऊंची शिष्टाई व्यर्थ ठरली आहे.

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित राहून विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर आज या नगरसेवकांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांची सुद्धा भेट घेतली. दरम्यान खासदार संजय काका पाटील यांनी मिरजेतील नगरसेवकांवर टीकास्त्र सोडलं. पोटासाठी राजकीय धंदा करणाऱ्या मिरजेतील नगरसेवकांना योग्य वेळी उत्तर दिलं जाईल, अशी टीका संजय काका पाटील यांनी आज केली.


लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मिरजेत पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी मिरजेतील भाजपच्या सर्व माजी नगरसेवकांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीला भाजप सोबत काही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे माजी नगरसेवक सुध्दा उपस्थित होते. यातील अनेक माजी नगरसेवक हे मंगळवारी बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेला उपस्थित होते. त्यामुळेच पालकमंत्री यांनी याबाबत बैठक घेतली आणि खासदार संजयकाका पाटील यांना मदत करत पक्षाचे काम करण्याचे आवाहन केले. मात्र यातील अनेक नगरसेवकांनी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत विशाल पाटील यांना मदत करणार असल्याचे सांगितले. विधान सभेला भाऊ तुम्हाला मदत करतो पण लोकसभेला आम्ही विशाल पाटील यांच्या सोबत राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितल्यामुळे खासदार संजयकाका पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहे.