yuva MAharashtra गरिबीच्या अंधारावर मात करत बकऱ्या वळणाऱी रमाई कन्या निघाली उगवत्या सूर्याच्या देशात !

गरिबीच्या अंधारावर मात करत बकऱ्या वळणाऱी रमाई कन्या निघाली उगवत्या सूर्याच्या देशात !


सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४

बुलढाणा: घरात अठराशेविश्व दारिद्र्य, बकऱ्या वळत घरच्यांना हातभार लावीत तिने जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि आता ती मोठ्या ‘पॅकेज’वर जपानमधील उद्योगसमूहात रुजू होणार आहे. एखाद्या कांदबरी वा चित्रपटात शोभावी अशी ही यशोगाथा आहे. ती कोलवड येथील रोहिणी अनिल गवईची! घरची परिस्थिति जेमतेम, वडील मजुर, यामुळे तिला उच्च शिक्षण घेणे अशक्य होते. तिने दहा बकऱ्या वळत तुटपुंज्या उत्पन्नात भर घातली. तिने तथागतांचा ‘मध्यम मार्ग’ स्वीकारला. दहावी नंतर शेतकी शाळेत कृषी पदविका घेतली. याबरोबरच बुलढाण्यातील ‘बो ट्री फाउंडेशन’ च्या माध्यमातून जपानी भाषा शिकत परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच आधारावर १८ वर्षीय रोहिणी जपान देशाकडे रवाना झाली.


या संस्थेच्या संपर्कात जपान देशातील विविध उद्योग आहेत. संस्थेने या कंपन्यांकडे तिचा सविस्तर तपशील असलेला अर्ज पाठविला. या धडपडीला अखेर यश मिळाले असूनरोहिणीला जपान मधील अन्न प्रक्रिया कंपनी मध्ये नोकरी मिळाली. कंपनीने तिला नियुक्तीपत्र व सोबत ‘व्हिसा’ सुद्धा पाठवीला. तिला एक लाख अठ्ठावन हजार रुपये महिना पगार मिळणार आहे.

जॉब मिळाला, पण तिकिटाचे काय ?

इथवर सगळं चांगलं झालं, पण अडचणी कायम होत्या. जपान देशात जाण्यासाठी तिकिटाचे पैसे कुठून आणायचे, हा बिकट प्रश्न वडील अनिल गवई यांना पडला. याची जुळवाजुळव अशक्य ठरल्याने लाडक्या लेकीसाठी वडिलांनी स्वतःचे घर गहान ठेवले! व्याजाने पैसे काढून तिकिटाचे तीन लाख रुपये जमा केले. ती एकटीच शनिवारी मुंबई व मुंबईवरून जपान देशाकडे रवाना झाली.