Sangli Samachar

The Janshakti News

विशालदादा, कुटनितीने कवचकुंडले तर गेली... पण आता हीच 'ती' वेळ आहे...



सांगली समाचार - दि. १० एप्रिल २०२४
सांगली - विशाल पाटील टीमला अखेर पर्यंत चर्चेत गुंतवून, झुलवत ठेवले व अखेरच्या क्षणी महाआघाडीतील मित्रपक्षांसमोर नांगी टाकून काँग्रेस श्रेष्ठींनी सांगलीची जागा शिवसेनेला बहाल केली, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील वसंतदादाप्रेमी व विशाल पाटील यांचे कार्यकर्ते अक्षरशः पेटून उठले आहेत. आणि आता कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायचे नाही, अपक्ष म्हणून लढवून विजय खेचून आणायचा, असा निर्धार व्यक्त करताना दिसत आहेत.

शिवसेनेच्या संजय राऊत यांनी काँग्रेस नेते डॉ. विश्वजीत कदम यांच्याविरुद्ध गरळ ओकली होती, त्याचा निषेध करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार बैठकीत, पत्रकारांनी विद्यमान खासदार संजय पाटील यांनी दिलेल्या आव्हानाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, विशाल पाटील यांनी खा. संजय पाटील यांना प्रति आव्हान दिलं. "खा. संजय पाटील यांनी पक्षाचे कवच कुंडले बाजूला ठेवून चड्डी घालून मैदानात यावे, मी हे लांग घालून तयार आहे !" असे म्हटले होते. योगायोगाने नव्हे, तर दुर्दैवाने विशाल पाटील यांचीच कवच कुंडले आधुनिक महाभारतातल्या 'कुटील कृष्णाने' काढून घेतली. त्यामुळे आता विशाल पाटील यांनीही मैदानात उतरून लढण्याची वेळ आली आहे.

तत्कालीन महाभारतात कर्णापुढे अर्जुनाचा टिकाव लागणार नाही हे ओळखून, कूटनीतीने त्याची कवच कुंडले काढून घेतली. इतकेच नाही तर कर्णाच्या रथाचे चाक भूमीत रुतवले. त्यामुळे अर्जुनाला निसहाय्य कर्णाचा वध करणे सोपे गेले. आजची राजकारणातील परिस्थितीही तत्कालीन महाभारतापेक्षा वेगळी नाही. ज्या पद्धतीने विशाल पाटील यांच्या भोवती कूटनीतीने जाळे विणून पराभवाच्या छायेत आणून उभे केले आहे ते पाहता, विशाल पाटील व दादा घराणे संपवण्याचे कारस्थान गल्लीपासून दिल्लीपर्यंत खेळण्यात जी मंडळी पुढे होती, त्यांचा इरादा स्पष्ट होतो.


हा सारा घटनाक्रम पाहून विशाल पाटील यांचे कार्यकर्ते व मतदार यांची पूर्ण सहानुभूती विशाल पाटील यांच्या पाठीशी उभी राहिली आहे म्हणूनच 'आत्ता नाही तर कधीच नाही' हा धोका ओळखून विशाल पाटील यांनी लढण्यास सज्ज व्हायला हवे. ज्या पद्धतीने स्व. मदन पाटील यांनी दरवाजा फोडून विधानसभेत प्रवेश केला होता, तसेच संसदेत विशाल पाटील यांनी मानाने दाखल व्हावे. अशी सर्वसामान्य कार्यकर्ते व दादा प्रेमी मतदारांची भावना आहे. याची कदर विशाल पाटील यांनीही राखायला हवी.

अर्थात हे जितके बोलणे, लिहिणे सोपे आहे तितके प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीच्या रणांगणावर लढणे सोपे नाही. पण आत्ता जर विशाल पाटील यांनी काँग्रेस श्रेष्ठींचा मान राखून संयम दाखवत शांत राहिले, तसा संयम दाखवून माघार घ्यायचे ठरवले, तर तो केवळ विशाल पाटील यांचाच नव्हे तर वसंतदादांचाही अवमान ठरेल.

राजस्थानचे राज्यपाल असताना, वसंतदादांनी आपल्याला कोंडीत पकडून बाजूला करण्याचे षडयंत्र पक्षातील काही मंडळी करीत असून आपल्या पाठीशी असलेल्या काँग्रेस मधील मंडळींना व कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे पाहून क्षणात राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. तोच खणखरपणा दाखवून विशाल पाटील यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना नामोहरण करीत, आपल्या धमणीतही त्याच वसंतदादांचे रक्त वाहत आहे. हे दाखवून देण्याची गरज आहे.