yuva MAharashtra जिथे ताकद नाही, त्याच जागा काँग्रेसच्या वाट्याला; जागा वाटपावर प्रश्नचिन्ह ?

जिथे ताकद नाही, त्याच जागा काँग्रेसच्या वाट्याला; जागा वाटपावर प्रश्नचिन्ह ?



सांगली समाचार - दि. १० एप्रिल २०२४
मुंबई  - महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे सांगत तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन उर्वरित जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. परंतु ज्या पद्धतीने काँग्रेस नेत्यांना खिंडीत गाठून जागावाटप केले गेले, त्यावरून आता सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलेले मत त्याचेच द्योतक म्हणावे लागेल.


काँग्रेस पक्षाला समाधानकारक जागा मिळाल्या नसल्याने वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिथे काँग्रेस निवडून येऊ शकते, त्याच जागा दिल्या नाहीत. परंतु, जिथे काँग्रेसची ताकद नाही त्या जागा पदरी पडल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे. खास करून दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचा आग्रह होता. या मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड दोनदा खासदार राहिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसची ताकद असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पटोले यांचे हायकमांडकडे बोट

दरम्यान, आज महाविकास आघाडीचं जे जागावाटप झालं आहे. ते हायकमांडच्या आदेशाने झालं आहे. त्यामुळे हायकमांडच्या आदेशाचे सगळेच पालन करतील. लोकशाही, संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. त्यामुळे कार्यकर्ते हायकमांडचा आदेश पाळतील. शिवाय जे नाराज आहेत, त्याचं समाधान आम्ही करू, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.