| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१६ एप्रिल २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाला जागा सोडली. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली, यानंतर आता काँग्रेसच्याविशाल पाटील यांनीही या जागेवर दावा केला असून पाटील यांनी आज अपक्ष उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, आज सांगलीत महाविकास आघाडीचा मेळावा झाला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी, 'काँग्रेसला शेतकऱ्यांचा लेक खासदार नकोय का, त्यांनी तसं सांगावं मी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे', असं मोठं विधान त्यांनी केलं. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
"माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल, त्रास वाटत असेल तर मी आज सर्वांच्या पुढं सांगतो मी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे. फक्त आपल्या मित्र पक्षाने एवढच जाहीर करावं की, शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून चालणार नाही. तुझ्या मागे कुठला कारखाना नाही, तुझा बाप आमदार नव्हता, खासदार नव्हता, तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता. म्हणून तुला आम्ही उमेदवारी देत नाही, असं त्यांनी जाहीर करावं माझी माघार घ्यायची तयारी आहे, असं मोठं विधान करत चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांना टोला लगावला आहे.
"काँग्रेस पक्षाने एवढंच जाहीर कराव की शेतकऱ्याचा पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही. भविष्यात शेतकरी कुटुंबातील मुलानं लोकसभा, विधावसभा लढवायची ही अपेक्षा तर करायची की नाही, असंही चंद्रहार पाटील म्हणाले.
सांगली लोकसभेत काँग्रेस अजूनही प्रचारात उतरलेली नाही. दुसरीकडे, विशाल पाटील यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता चंद्रहार पाटलांसमोर विशाल पाटील यांचं मोठं आव्हान असणार आहे. यामुळे आज महाविकास आघाडीच्या मेळाव्यात चंद्रहार पाटील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.