yuva MAharashtra भूमिपुत्रांना आपल्याच जागेत जाण्यास मज्जाव, चिनी ड्रगनने हिंदुस्थानचा भूभाग गिळला

भूमिपुत्रांना आपल्याच जागेत जाण्यास मज्जाव, चिनी ड्रगनने हिंदुस्थानचा भूभाग गिळला



सांगली समाचार - दि ७ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - देशातील कॉर्पोरेट कंपन्यांनी लडाखची दीड लाख चौरस किलोमीटर कुरण जमीन बळकावली असताना चीननेदेखील गेल्या पाच वर्षांत हिंदुस्थानचा मोठा भूभाग गिळला आहे. भूमिपुत्र गुराख्यांना या जागेत जाण्यापासून चिनी सैनिक अडवत आहेत. या गंभीर गोष्टीकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असून देशापासून सत्यही लपवल्याचा खळबळजनक आरोप पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांनी केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे दुर्लक्ष आणि चीनच्या मुजोरीविरोधात वांगचुक उद्या 7 एप्रिल रोजी हिंदुस्थान-चीन सीमेवर धडक मोर्चा काढणार आहेत. हिंदुस्थानची किती जागा चीनने बळकावली हे या मोर्चातून दाखवणार आहेत.


सोनम वांगचुक यांनी विविध मागण्यांसाठी 21 दिवसांचे उपोषण केले होते. त्यानंतर त्यांनी आता मोर्चाची घोषणा केली असून चीनच्या सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात लडाखचे 10 हजार लोक सहभागी होतील, असेही वांगचुक यांनी सांगितले आहे. भाजपने 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही लडाखला स्वतंत्र दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. मागील वर्षी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पुन्हा तेच आश्वासन दिले गेले, पण ना हे आश्वासन पूर्ण केले गेले, ना त्या दिशेने ठोस पावले टाकली गेली. आता तर लेहमध्ये सहावे परिशिष्ट असा शब्द उच्चारणाऱयांवर दडपशाही केली जाते, असा आरोप वांगचुक यांनी केला आहे.

मोर्चाचा प्रशासनाने घेतला धसका

सीमारेषेवर जाणाऱया या मोर्चाचा धसका प्रशासनाने घेतला असून मोर्चात लोकांनी सहभागी होऊ नये, असा प्रयत्न केला जात आहे. लेह-लडाखमध्ये 24 तासांसाठी इंटरनेटचा स्पीड 2 जी पर्यंत प्रतिबंधित केला. जिल्हाधिकाऱयांच्या परवानगीशिवाय मोर्चा काढता येणार नाही, असे आदेश दिले आहेत.

अशा आहेत मागण्या

– सध्या केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला राज्यघटनेतील सहाव्या परिशिष्टानुसार पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा.
– लडाखमध्ये सध्या लोकसभेची एक जागा आहे. त्या दोन कराव्यात, राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळावे.
– लडाखमध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना करावी, अशा प्रमुख मागण्या वांगचुक यांनी केल्या आहेत.