सांगली समाचार - दि. १० एप्रिल २०२४
मुंबई - पत्रकार परिषद घेत मविआने आपला फॉर्मुला अखेर जाहीर केला. यामध्ये अनेक दशकांपासून कॉंग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेले सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसच्या हातातून सटकले आहेत. यावरुन अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला घेरले असून काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व कमकुवत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे.
अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. सत्ताधारी पक्षांनी काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व त्यांच्या दोन पारंपरिक जागा आपल्याकडे घेऊ शकले नाही, असं म्हणत राज्यातल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका होत आहे. यानंतर आता अशोक चव्हाण देखील आक्रमक झाले आहेत.
कॉंग्रेसचं नेतृत्व खूप कमकुवत
भाजप खासदार अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेसकडे नेतृत्वाचा अभाव आहे. राज्यात काँग्रेसला केवळ 17 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसची इतकी केविलवाणी परिस्थिती यापूर्वी कधीच झाली नव्हती. राज्यातलं कॉंग्रेसचं नेतृत्व खूप कमकुवत झालं आहे. काँग्रेसच्या हक्काच्या जागा त्यांना मिळाल्या नाहीत. काँग्रेसला त्यांच्या पारंपरिक सांगली आणि भिवंडीच्या जागा सोडाव्या लागतात, यातून पक्षाचं नेतृत्व किती कमकुवत झालंय हे सिद्ध होतं. महाविकास आघाडीत अवघ्या 17 जागांवर काँग्रेसची बोळवण होतेय, हे त्यांच्यासाठी वाईट चित्र आहे. सांगलीत काँग्रेस कमकुवत नाही तर पक्षाचं राज्यातलं नेतृत्व कमकुवत आहे, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.