सांगली समाचार - दि ६ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने आतापर्यंत ४०० हून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. सलग तिसऱ्यांदा सरकार बनवण्यासह मित्रपक्षांसोबत ४०० हून अधिक जागा जिंकण्याचे सत्ताधारी पक्षाचे लक्ष्य असून, ते गाठण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळेच पक्षाने आयात नेत्यांना तिकीट देण्यासही संकोच केलेला नाही. भाजपचे तब्बल २८ टक्के उमेदवार दुसऱ्या पक्षांतून आलेले आहेत. आतापर्यंत भाजपने ४१७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यापैकी एकूण ११६ उमेदवार दुसऱ्या पक्षांतून भाजपमध्ये सामील झालेले आहेत. देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. तेथे आतापर्यंत ६४ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यातील २० जागांवर निवडणुकीपूर्वी अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केवळ या राज्यातच नाही तर तामिळनाडूत ११, पश्चिम बंगाल व ओडिशात प्रत्येकी आठ व महाराष्ट्रात सात आयाराम-गयारामांना भाजपने तिकीट दिले आहे.
२१ राज्यांत पक्षांतर करून आलेल्यांना देण्यात आले तिकीट
- भाजपने १८ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांत अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांना तिकीट दिले आहे. पक्षाच्या ४१७ उमेदवारांपैकी ११६ जणांनी अलीकडेच पक्षात प्रवेश केला आहे.
- तब्बल २७.८२ टक्के उमेदवार मूळ भाजपचे नाहीत. पुद्दुचेरीत पक्षाचा एकमेव उमेदवार दुसऱ्या पक्षाचा आहे.
- त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशात पक्षाचे ६ पैकी ५ उमेदवार पक्षांतर करून आलेले आहेत. तेलंगणात भाजपने १७ उमेदवार उभे केले असून, त्यापैकी १२ जण दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत.
सहा राज्यांत ५० टक्के आयात उमेदवार
सहा राज्यांत भाजप पक्षांतर करून आलेल्या नेत्यांवर अवलंबून आहे. आंध्र प्रदेशात ८३ टक्के, दादरा आणि नगर हवेली, हरयाणात ६० टक्के, पुद्दुचेरीत १०० टक्के, तेलंगणात ७०.५९ टक्के आणि पंजाबमधील ६६ टक्के उमेदवार निवडणुकीपूर्वी अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत.