yuva MAharashtra सभा गाजवली राज ठाकरेंनी; खर्च भाजपच्या बोकांडी ?

सभा गाजवली राज ठाकरेंनी; खर्च भाजपच्या बोकांडी ?



सांगली समाचार - दि. १२ एप्रिल २०२४
मुंबई - मनसेने गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या सभेचा खर्च आता भाजपच्या निवडणूक खर्चात गणला जाण्याची चिन्हे आहेत कारण मनसेने पारंपारिक गुढीपाडवा मेळावा आयोजित केला होता पण या सभेत थेट राजकीय प्रचार झाला. मोदींना विनाशर्त पाठिंबा देण्याची राजकीय घोषणा झाली. पारंपारिक मेळाव्याला राजकीय प्रचार सभेचे स्वरुप प्राप्त झाल्यामुळे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार या सभेचा खर्च भाजपच्या खात्यात जमा होण्याची चिन्हे आहेत.

गुढीपाडव्याच्या पारंपारिक मेळाव्याच्या आधी मनसेने जाहिराती प्रसिध्द केल्या होत्या. नक्की काय घडलय, काय घडतय, हे सांगायचे आहे अशी जाहिरात केली होती. पण या सभेत राज ठाकरे यांनी थेट राजकीय भूमिका घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली. वास्तविक पारंपारिक मेळाव्यात राजकीय प्रचार करणे निवडणूक आयोगाला अपेक्षित नाही. त्यामुळे या सभेचा समावेश निवडून प्रचार सभेत करण्याची चिन्हे आहे. नियमानुसार सुरवातीला हा खर्च राजकीय पक्षाच्या पर्यायाने भाजपच्या खात्यात गणला जाईल. मग पुढे या दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी अर्ज भरला तर त्यांच्या निवडणूक खर्चात वर्ग केला जाईल असे सूत्रांनी सांगितले.


खर्चाचा नियम

आचारसंहिता लागू झाल्यापासून मतमोजणीचा काळ सुमारे दोन महिन्यांचा आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी मोठा अवधी मिळणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून खर्च गणाला जाणारा आहे. ती अनेक उमेदवारांनी आतापासूनच व्यक्तीगत स्तरावर प्रचार सुरु केला आहे. वेगवेगळ्या प्रकारचा खर्च उमेदवारांकडून होत आहे. संबंधित उमेदवाराची उमेदवारी राजकीय पक्षाकडून निश्चित असेल तर हा खर्च उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी संबंधित पक्षाच्या खात्यात गणला जाईल. अर्ज भरल्यानंतर मतदानाच्या दिवसापर्यंतचा खर्च हा संबंधित उमेदवाराच्या खात्यात गणला जाईल. प्रचाराशी संबंधित ज्या गोष्टीसाठी परवानगी आवश्यकता आहे. असा खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट होईल असे निवडणूक आयोगाचा नियम आहे.