Sangli Samachar

The Janshakti News

'सांगली'वरून महाविकास आघाडीमध्ये पहिली ठिणगी!



सांगली समाचार - दि ३ एप्रिल २०२४
सांगली  - महाविकास आघाडीमध्ये  पहिली मोठी ठिणगी पडण्याची शक्यता असून त्याला सांगलीच्या जागेचा वाद  कारणीभूत ठरणार असं दिसतंय.सांगलीची जागा ही काँग्रेसलाच मिळावी आणि त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल असं या आधी सांगणाऱ्या आमदार विश्वजीत कदम यांनी आता खरोखरच टोकाची भूमिका घेतल्याचं दिसतंय. जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आपण काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलंय.

आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तशा आशयाचं एक पत्र लिहिलं आहे. सांगलीच्या जागेबद्दल आपल्या भावना काय आहेत हे तुम्ही जाणता, त्यामुळे महाविकास आघाडीकडून सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आपण पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही असं विश्वजित कदम म्हणाले. त्यामुळे आता सांगलीचा वाद राज्याच्या राजकारणात नेमकी कोणती दिशा घेणार हे पाहावं लागेल.


काय म्हटलंय विश्वजित कदम यांनी ?

राज्यात आगामी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण ताकदीने लढवणारच आहोत. माझी आणि सांगलीतील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची सांगली लोकसभेच्या जागेबाबतील असणारी भावना आपण जाणत आहात. गेल्या काही दिवसांपासून सांगली आणि राज्यातील इतर काही लोकसभेच्या जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवण्यास सक्षम आहे या भूमिकेवरती मी आणि सांगली जिल्ह्याती कार्यकर्ते आजही ठाम आहोत. तसेच अद्यापही सांगली लोकसभा जागेबाबतील काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीने आम्हाला कोणताही निर्णय कळवलेला नाही.

त्यामुळे जोपर्यत सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील पक्षाचा कार्यकर्ता आणि आमदार म्हणून मी पक्षाच्या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगलीसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल

सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चढाओढ आहे. त्याचवेळी कोल्हापूरची जागा शिवसेनेने काँग्रेसला दिली त्यामुळे सांगलीची जागा आमची असल्याचं सांगत शिवसेनेने सांगलीचा उमेदवारही घोषित केला. सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करून प्रचाराची सुरुवातही केली.

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून ही जागा आम्हाला मिळावी अशी मागणी काँग्रेसची होती. त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या जागेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी ती घेईन अशी भूमिका विश्वजित कदम यांनी घेतली आहे.