yuva MAharashtra पटोलेंनी राऊताना झापलं...

पटोलेंनी राऊताना झापलं...



सांगली समाचार - दि. ७ एप्रिल २०२४
मुंबई  - महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरुन खडाजंगी रंगलेली आहे. यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना चांगलंच झापलं. संजय राऊतांनी आपली नौटंकी थांबवावी, असा सल्ला पटोलेंनी दिला आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. राऊत यांनी सांगलीत काँग्रेस राष्ट्रवादीने नौटंकी थांबवावी असा टोला मारला होता त्यावर पटोले बोलत होते.

नाना पटोले म्हणाले की, "संजय राऊत यांनी आपली नौटंकी थांबवावी. खरंतर ते शिवसेनेचे एक मोठे नेते आहेत. त्यांनी काय बोलावं याच्या मर्यादा ठेवाव्यात. मी वारंवार सांगतोय की, हा प्रश्न आम्ही वरिष्ठ पातळीवर सामोपचाराने सोडवू. त्यामुळे संजय राऊतांनी एका छोट्या कार्यकर्त्यासारखं वक्तव्य करु नये, असा माझा त्यांना सल्ला आहे. येत्या एक दोन दिवसांत या सगळ्या प्रश्नांवर आम्ही पडदा टाकू," असे ते म्हणाले.


सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतरही महाविकास आघाडीचा तिढा कायम आहे. काँग्रेस आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा करण्यात येत आहे. या जागेवरून काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात वाद सुरु आहे.

उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभेसाठी डबल केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, यावरून काँग्रेस पक्षात नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेबाबत दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली असून आता ते नाना पटोलेंचीही भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.