सांगली समाचार - दि. ५ एप्रिल २०२४
मुंबई - "सांगलीचा विषय हायकमांडकडे पाठवला आहे. विशाल पाटील यांच्या पुनर्वसनाचा हा प्रश्न नाही. सांगलीची जागा ही काँग्रेसचीच आहे आणि विशाल पाटील यांना उमेदवारी फायनल झाली आहे. असे सांगून नाना पटोले यांनी, शिवसेना नेते संजय राऊत सांगलीच्या पिचवर आले असतानाच मुंबईतून सिक्सर ठोकला आहे.
संजय राऊत सांगली मतदार संघाचा दौरा करीत असतानाच, काँग्रेसला चुचकारून ही सीट पदरात पाडून घ्यायचा शिवसेनेचा इरादा फोल ठरला आहे. कारण सांगलीतील कार्यकर्त्यांनी ज्याप्रमाणे राऊत यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे, त्याचप्रमाणे राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनीही शिवसेनेच्या धमकीला भीक घातली नाही.
ज्यांनी सांगलीची उमेदवारी प्रतिष्ठेची केली आहे, ते डॉ. विश्वजीत कदम व संभाव्य उमेदवार विशालदादा पाटील एका खास विमानाने दिल्ली दरबारी पोहोचले आहेत. दिल्लीत काय निर्णय होतो, यावर सांगलीच्या तिढ्यावर पुढील दिशा ठरणार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत सांगलीच्या सीट वरून माघार घ्यायची नाही असा ठाम निर्धार सर्वांनीच घेतल्याने आघाडीत बिघाडी होण्याचे चिन्ह दिसत आहेत. आणि अशी बिघाडी झालीच, तर मतदारांना ही सारी मंडळी आपल्या बाजूने कसे वळवणार ? याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.