सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेना नेतृत्वाने अखेर ताठर भूमिका सोडली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जागेबाबत चर्चेची तयारी दर्शवली आहे. दिल्लीतून महाराष्ट्रात आल्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसह आमदार विश्वजित कदम यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे दिल्लीतील चर्चेत ठरले आहे. आमदार विश्वजित कदम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
दिल्लीत काल इंडिया आघाडीचा मोर्चा निघाला. त्यात सांगलीसह भिवंडी आणि मुंबईतील तीन वादग्रस्त जागांवर चर्चा अपेक्षित होती. सकाळी प्रदेश काँग्रेसचे नेते आणि शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यात प्राथमिक चर्चा झाली. शिवसेनेकडून सांगलीवरील दावा सोडला जाणार नाही, असा सकाळी निरोप देण्यात आला होता. काँग्रेस नेत्यांनीही आम्ही सांगली लढतोय, मैत्रीपूर्ण लढत करू, असा निरोप शिवसेनेला दिला. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असून, त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चेची तयारी दर्शवली आहे.
आमदार विश्वजित कदम म्हणाले, ''सांगली लोकसभा मतदारसंघ लढवण्याबाबत आम्ही ठाम आहोत. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे. हे वातावरण नक्कीच काँग्रेसला ताकद देणारे आणि नवी उभारी देणारे आहे. आम्ही शिवसेना नेतृत्वाला आज दिल्लीत त्याची कल्पना दिली आहे. त्यांनी या जागेबाबत चर्चेची तयारी दर्शवली, हे महत्त्वाचे आहे. चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल आणि महाविकास आघाडीच्या हिताचा निर्णय होईल, अशी मला खात्री आहे.''
सांगली, दक्षिण मध्य मुंबईमधून काँग्रेसला लढू द्या!
मुंबई : ठाकरे गटाचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आता महाराष्ट्रातील जागा वाटपाबद्दलची चर्चा २०२९ सालीच होईल, असे सांगत लोकसभा मतदारसंघांच्या फेरविचारास ठाम नकार दिला असला तरी सांगली, दक्षिण मध्य मुंबई या दोन्ही जागा काँग्रेसच्या आहेत. त्या परत घ्या, अशी विनवणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना केली आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचा सांगली लोकसभा मतदारसंघात कोणताही प्रभाव नाही तर मुंबईतील दक्षिण मध्य मतदारसंघात काँग्रेस शहराध्यक्ष वर्षा गायकवाड उत्तम लढत देत विजयी होऊ शकतात. परिस्थिती अनुकूल असताना काँग्रेसने या दोन्ही जागांसाठी आग्रह धरायला हवा, असे आग्रही प्रतिपादन आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांना करण्यात आले. पक्षाच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांच्याशीही या विषयावर बोलणे झाले. त्यांनी या संबंधात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती नाना पटोले यांनी 'सकाळ'ला दिली. यासंदर्भात आता हायकमांड योग्य वाटेल तो निर्णय घेतील, असेही पटोले म्हणाले.
भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हवी असल्याची चर्चा आहे. मात्र, काँग्रेस या जागेबाबत ठाम आहे. काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी दिल्लीत आयोजित झालेल्या रॅलीनंतर तेथे हजर असलेल्या उद्धव ठाकरेंशी गांधी मातापुत्र चर्चा करतील, असा विश्वास काँग्रेसच्या प्रदेशातील नेत्यांना होता. उद्धव ठाकरे यांनाही पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील कौल अपेक्षित असल्याने ते समजूतदारपणा दाखवतील, अशी आशाही नेत्यांनी बोलून दाखवली.