| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि.२० एप्रिल २०२४
अन्नपाण्याच्या शोधात बिबट्या मानवी वस्तीत शिरल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. कधी माणसांवर हल्ला तर कधी प्राण्यांवर. असाच एक बिबट्या जो कोंबड्यांची शिकार करायला आला. पण कोंबड्यांची शिकार त्याला चांगलीच महागात पडली. पुण्यातील ही घटना आहे.
पाळीव प्राण्यांची शिकार करून बिबट्याने त्यांना आपल्या जबड्यात नेल्याचे व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील. पण पुण्यात कोंबड्यांची शिकार करायला आलेला बिबट्या मात्र स्वतःच फसला आहे, त्याचा व्हिडीओही समोर आला आहे. पहाटे कोंबड्यांची शिकार करायला आलेला बिबट्याच कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला आहे.
बिबट्या आत कसा अडकला ?
बिबट्या जसा खुराड्यात कोंबडीची शिकार करायला गेला, तसं शेतकऱ्यानं खुराड्याचं दार बंद केलं. त्यामुळे शिकारीसाठी आलेला बिबट्या स्वतःच अडकला. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. जुन्नर येथील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राच्या पथकाने खुराड्यात अडकलेल्या बिबट्याला भुलीचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं आणि माणिकडोह बिबट निवारा केंद्रात पाठवण्यात आलं.