| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२० एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय प्रचाराने जोर धरला आहे. पहिल्या टप्प्यात २१ राज्य आणि १०२ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. त्यातील ५ मतदारसंघ महाराष्ट्राच्या विदर्भातले आहेत. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून काँग्रेसच्या राहुल गांधींपर्यंत अनेक दिग्गज विदर्भात प्रचारासाठी दाखल होत असताना दुसरीकडे राजकीय पक्षांकडून जागा जिंकण्याचे केले जाणारे दावे चर्चेत आहेत. भाजपानं ‘अब की बार, ४०० पार’चा नारा दिला असताना देवेंद्र फडणवीसांनी आघाड्या ही काळाची गरज असल्याची बाब अधोरेखित केली आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांना विद्यमान राजकीय स्थिती आणि भविष्यातील वाटचाल याबाबत विविध प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण आणि भाजपासह महायुतीत जोडले जाणारे पक्ष, यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी ‘आघाड्या ही आता काळाची गरज झाली असून या वास्तवाबरोबर जगणं आपण सगळ्यांनी शिकून घेतलं पाहिजे’, असं विधान केल्याचं टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
मित्रपक्षांमुळे भाजपातील नेते नाराज ?
‘महायुतीत आता अनेक पक्ष आले आहेत. सुरुवात एकनाथ शिंदेंपासून झाली. नंतर अजित पवार आले. आता राज ठाकरेही येतायत. या स्थितीत अनेक भाजपा नेते त्यांच्या संधी विभागल्या जात असल्याबाबत नाराज आहेत, यावर नेमकी भूमिका काय?’ अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांना करण्यात आली होती. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं.
“कुणालाही महत्त्वाकांक्षा असणं यात गैर काहीही नाही. पण आता सत्तेचा मार्ग आघाड्यांच्याच मदतीने पार होऊ शकेल, या राजकीय वास्तवाबरोबर जगणं आपण सगळ्यांनी शिकून घ्यायला हवं. आघाड्या या निवडणूक राजकारणाची गरज असतात. प्रत्येकानं या सत्याचा स्वीकार करायला हवा. महाराष्ट्रात भाजपाकडे सुरुवातीला १६ टक्के मतांचा हिस्सा होता. तो वाढून २८ टक्के झाला. आता तो ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जर आम्हाला ५० टक्क्यांचा टप्पा ओलांडायचा असेल, तर नवीन मित्र बनवावेच लागतील. त्यासाठी तडजोडी करणं ही काळाची गरज आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यात भाजपाचा वाटा आकुंचित होत चाललाय का ?
दरम्यान, महायुतीत जेवढे मित्रपक्ष येतील, तेवढा भाजपाचा वाटा कमी होत जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी ही शक्यता फेटाळून लावली. “भाजपाचा वाटा कमी होत असल्याच्या मुद्द्याशी मी असहमत आहे. तुम्ही असं म्हणू शकता की आमची राज्यात वाढ झालेली नाही. आमचा वाटा तेवढाच राहिलाय. अजित पवारांच्या येण्यामुळे फक्त ज्या जागा मूळ शिवसेनेनं लढवल्या असत्या, त्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर वाटल्या गेल्या आहेत इतकंच”, असं ते म्हणाले.