| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि.२१ एप्रिल २०२४
भारतामध्ये कीटकांची एक नवीन प्रजाती शोधण्यात यश आले आहे. न्यूझीलंड येथील आंतरराष्ट्रीय जर्नल 'झुटाक्सा'मध्ये १२ एप्रिल २०२४ रोजी याबाबतचा शोधप्रबंध प्रकाशित झाला. 'मोरेश्वर' असे या कीटकाचे नामकरण केले आहे. मृत प्राणी किंवा व्यक्तीचे शरीर खाऊन पर्यावरणातील साफसफाईचे कार्य त्यांच्याकडून होते.
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा सुरेशचंद्र कलावटे यांनी या कीटकाचा शोध लावला. प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या पश्चिम प्रादेशिक केंद्रात त्या कार्यरत आहेत. द. आफ्रिकेच्या डिट्सॉन्ग नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचे संचालक वर्नर पी. स्ट्रुम्फर यांनी शोधप्रबंधाचे सहलेखक म्हणून सहकार्य केले.
मोरेश्वर मंदिर परिसरात दिसला
डाॅ. अपर्णा यांनी गेल्यावर्षी बीटल अर्थात ओमोर्गस खान्देश स्ट्रुम्फर आणि कलावटे, २०२३ हा शोधप्रबंध सादर केला होता. नव्याने सापडलेला कीटक ट्रोगिडे कुटुंबातील आहे. नवीन कीटकाबाबत ओमोर्गस (ॲफ्रोमॉर्गस) मोरेश्वर कलावते आणि स्ट्रुम्फर, २०२४ हा शोधप्रबंध सादर केला.
हा कीटक १३ एमएम आकाराचा आहे. त्याच्या नऊ प्रजाती आहेत. या शोधामुळे भारतातील या प्रजाती दहावर गेल्या आहेत. मोरगाव येथील मोरेश्वर मंदिर परिसरात हा कीटक सापडला. त्यामुळे या कीटकाचे 'मोरेश्वर' नामकरण केले.
पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ
केराटिन कीटकांचा भारतामध्ये कमी अभ्यास केला जातो. डाॅ. अपर्णा कलावटे या ट्रॉगिड कीटकांवर काम करणाऱ्या पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी कीटकांच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावला. आजपर्यंत केवळ परदेशी शास्त्रज्ञच भारतीय ट्रॉगिड जीवजंतूंचे वर्णन करत होते.
हे कीटक मृत जीवांचे शव खाऊन पर्यावरणाची स्वच्छता करण्यात मानवाला मदत करत आहेत. या चिमुकल्या कीटकाच्या संवर्धनासाठी त्याचे महत्त्व आणि स्वरूप याविषयी जनजागृती आवश्यक आहे. भारतातील या कमी अभ्यासलेल्या प्रजातींचे दस्तऐवजीकरण करणे हेच उद्दिष्ट आहे. असे डॉ. अपर्णा कलावटे यांनी म्हटले आहे.