Sangli Samachar

The Janshakti News

'...तर भाजप विनवण्या करायला येईल'; गृहीत धरु नका म्हणत अजितदादांच्या मंत्र्यांचा इशारा



सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरुन राज्यात स्थानिक पातळीवर मित्र पक्षांमध्येच वाद होताना दिसत आहेत. प्रचार सुरु होण्याआधीच असे चित्र असल्याने मित्रपक्षांमधील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अशातच अजित पवार गटाचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला जाहीर इशारा दिला आहे. भाजपने किंवा इतर पक्षाने आम्हाला गृहीत धरू नये असे मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

"ज्या पक्षाची उमेदवारी असते त्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी सर्व घटक पक्षांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मला गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांचा फोन आला, मी त्यांना सांगितले जो पर्यंत आमच्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान मिळत नाही. तालुका पातळीवर, समितीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आदर मिळत नाही. तो पर्यंत आम्ही काम करणार नाहीत. भाजपने आम्हाला गृहीत धरू नये आमची जिल्ह्यात मोठी ताकद आहे," असा इशारा मंत्री अनिल पाटील यांनी भाजपला दिला आहे.


आमच्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय नेत्यांचा फोटा महायुतीच्या बॅनरवर नसेल तर त्या ठिकाणी कुणी पाय ठेवणार नाही असेही अनिल पाटील यांनी म्हटलं आहे. "अनेकदा बॅनरवर फोटो न लावल्याने कार्यकर्ते नाराज होतात. मात्र फोटो लावल्याने कुणी मोठा किंवा छोटा होत नाही. 35 वर्षात मी कधीच कोणत्याही बॅनरवर माझा फोटो पहिला नाही, मात्र मी याचा कधी विचार करत नाही. पण महायुतीच्या बॅनरवर जेव्हा प्रचार सुरू होईल त्यावेळी राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय नेत्यांचा फोटो त्या ठिकाणी असायला हवा. मात्र आपल्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय नेत्यांचा महायुतीच्या बॅनरवर फोटो नसेल तर त्या ठिकाणी कुणी पाय ठेवणार नाही," असा इशारा मंत्री अनिल पाटील यांचा भाजपसह इतर पक्षांना दिला आहे.

"आपले पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांनी अनेक शंका उपस्थित केली की येत्या काळात आपल्या पक्षाला स्थान काय असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित दादांनी दिलेल्या हुकुमाचे पालन करणारा पक्ष आहे. इतर पक्षांनी असे समजू नये जुनी राष्ट्रवादी आहे ही नवी राष्ट्रवादी आहे. नवीन विचारांचे पदाधिकारी या राष्ट्रवादी मध्ये आहेत. इतर पक्ष जसे जुन्या राष्ट्रवादीला मॅनेज करून घ्यायचे मात्र नवीन राष्ट्रवादी कोणत्याही पक्षाला मॅनेज होणार नाही. दोन्ही मतदार संघात आपल्याला पक्षाचे अस्तित्व निर्माण करावे लागेल. जरी लोकसभेची निवडणूक असली तरी दोन्ही लोकसभा मतदारसंघात एका बूथ वरती 15 कार्यकर्ते उभे केले तर
भाजप काय जगातला कुठलाही पक्ष हा आपल्या विनवण्या करायला आल्या शिवाय राहणार नाही," असेही अनिल पाटील म्हणाले.