| सांगली समाचार वृत्त |
विटा - दि.१७ एप्रिल २०२४
महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चारचाकी गाडीत बसवून चोरी करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील टोळीला विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नेवरी (ता. कडेगाव) येथील कौशल्या अधिकराव महाडिक यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार लक्ष्मी उमेश खडतरे उर्फ बद्री पवार (वय ३० रा. सोलापूर), उमेश बापू खडतरे (वय ३०, रा. चिंतामणीनगर, सोलापूर), सचिन शिवाजी पवार (वय ३५, रा. तांबोळे, ता. माहोळ), दिपा सचिन पवार (वय ३०, रा. तांबोळे, ता. माहोळ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चार चाकी गाडीसह सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गेल्या महिन्यात ३ मार्चला कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील कौशल्या महाडिक यांना विट्याला जायचे होते. यादरम्यान एक सोनेरी रंगाची चारचाकी ( क्र.एम.एच. १२ ई.जी. ४० २८) विट्याकडे निघाली होती. कोणतेही वाहन न मिळाल्याने त्यांनी या चारचाकी वाहनाला लिफ्ट मागून त्या वाहनातून निघाल्या. थोडे अंतर पार केल्यानंतर या चारचाकी वाहनात असणाऱ्या लक्ष्मी खडतरे, उमेश खडतरे, सचिन पवार आणि दिपा पवार यांनी कौशल्या महाडिक यांना धमकावत त्यांचे दागिने लुटले. व तेथून वाहनाने पळ काढला.
या टोळीला विटा पोलिसांनी आज (मंगळवारी) ताब्यात घेत त्यांच्याकडून ३० ग्रॅम वजनाचे २ लाख ४ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण, ६८ हजार रुपयांचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे २ मंगळसूत्र आणि ४० हजार ८०० रुपयांची ४ ग्रॅम वजनाची बोरमाळ व २ ग्रॅम वजनाची कर्णफुले आणि २ लाख रुपयांची गाडी असा एकूण ५ लाख १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे सर्व संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक चोरी, जबरी चोरी यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच सचिन पवार आणि दिपा पवार हे दोघे पती -पत्नी असून दौंड (जि. पुणे) येथील पोलीस ठाण्यात त्यांच्यावर ६ गुन्हे दाखल आहेत.