yuva MAharashtra अपघातग्रस्त चार चाकीजवळ पोहोचले पोलीस, पाहतो तर त्यात सापडले काय?

अपघातग्रस्त चार चाकीजवळ पोहोचले पोलीस, पाहतो तर त्यात सापडले काय?



सांगली समाचार - दि ९ एप्रिल २०२४
विटा - हिवरे गावाजवळील अपघातग्रस्त चारचाकी गाडीत ६८ हजारांचा गुटखा सापडल्याची माहिती समोर आली आहे. विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक मेमाणे म्हणाले, रविवारी (दि. ८) सकाळी ११ च्या दरम्यान हिवरे गावच्या हद्दीत नागज ते भिवघाट रस्त्यावर एका चारचाकी गाडीचा (क्र. एम एच १२ एन एक्स ०४३६) अपघात झाला होता. याप्रकरणी भरधाव वेगात गाडी चालवून अपघात केल्याबाबत चालक महादेव प्रकाश पाटोळे, (वय ३८, रा. पेडगांव रोड वडूज, ता. खटाव, जि सातारा) याच्या विरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गाडीची तपासणी केली असता, गाडीत दोन बारदानची पोती आढळून असून त्यातील एका लहान पोत्यामध्ये विमल पान मसाल्याचे एकूण ५२ पाकीट, असे ८ पोत्यात ४१६ पाकीटे होती. तसेच तीन पांढऱ्या रंगाची नायलॉनच्या पोत्यात एकूण ६२४ तंबाखूची पाकीटे होती. या दोन्हींची किंमत ६८ हजार ६४० रुपये इतकी आहे. याबरोबरच चार लाख रुपये किमतीची संबंधित गाडी (क्र. एम एच १२ एन एक्स ०४३६) जप्त करण्यात आली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी महादेव विष्णू चव्हाण यांनी फिर्याद दिली.या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर करीत आहेत.