| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१७ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येऊन ठेपली तरी सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. विशाल पाटीलयांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत एकीकडे ठाकरे गटाचे नेते काँग्रेसनेच विशाल पाटलांची समजूत काढावी, असे सांगत आहेत. परंतु, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते विशाल पाटलांचा दावा योग्य आहे, अशा धाटणीची वक्तव्यं करुन त्यांच्या नाराजीला आणखी खतपाणीच घालत आहेत. या सगळ्या घडामोडी सुरु असताना आता काँग्रेसचा माजी तरुण नेता विशाल पाटलांच्या बाजूने रिंगणात उतरला आहे. हा नेता म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नसून सत्यजित तांबे आहेत.
सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी पक्षाच्या आदेशाविरोधात जात अपक्ष उमेदवार अर्ज भरला होता. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली होती. या निवडणुकीत सत्यजित तांबे निवडून आले होते आणि त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली होती. त्यानंतर सत्यजित तांबे महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे चर्चेत नव्हते. मात्र, आता सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा देत पु्न्हा एकदा काँग्रस नेतृत्त्वाविरोधात शड्डू ठोकला आहे. सत्यजित तांबे हे महाराष्ट्रातील आश्वासक तरुण नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांना दिलेला पाठिंबा सांगलीत मविआच्या चंद्रहार पाटील यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करणारा ठरु शकतो.
सत्यजित तांबे यांनी नेमकं काय म्हटलंय ?
सत्यजित तांबे यांनी आपल्या एक्स हँडलवर विशाल पाटील यांचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये सत्यजीत यांनी विशाल पाटील यांची बाजू मांडताना म्हटले आहे की, विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय, हे फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले ह्याचा विचार होणे गरजेचे आहे. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे. वसंतदादा पाटलांचे ह्या महाराष्ट्रावर व आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत, विशेषतः त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर, इंजीनियर तयार होत आहेत. विशालदादा हे वसंतदादांचा कामाचा वसा व वारसा पुढे घेऊन जाण्यात पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळेच त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, विशालदादांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.