सांगली समाचार - दि ८ एप्रिल २०२४
मुंबई - नुकताच उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळा जरी सगळ्यांना नको नकोसा वाटत असला, तरी उन्हाळ्यातील एक गोष्ट सगळ्यांना खूप आवडते. ती म्हणजे आंबा… कारण आंबा हा केवळ उन्हाळ्यातच येतो. त्यामुळे आंब्याच्या बहाण्याने का होईना पण लोकांना उन्हाळा आवडतो. तसं पाहायला गेलं तर आपल्या भारतामध्ये आंब्याच्या विविध जाती उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती देखील विविध आहेत.
बाजारात अनेक प्रकारचे आंबे मिळतात. जर तुम्हाला विचारलं की, बाजारातील सगळ्यात महाग आंबा कोणता? तर तुम्ही कदाचित रत्नागिरीचा हापूस आंबा असे म्हणाल. परंतु तुम्हाला माहित आहे का? एक असा आंबा आहे जो जगातील सगळ्यात महागडा आंबा आहे. या आंब्याला मीयाझाकीया नावाने ओळखतात. हा जपानमधील आंबा आहे.
हा आंबा माणिक जांभळी रंगाचा असतो. सुरुवातीला हा आंबा पिवळा असतो. परंतु जसा तो पिकतो तसा त्याचा रंग जांभळा ते लाल अशाप्रकारे होतो. हा आंबा चवीला अत्यंत गोड आहे. एकदा खाल्ल्यावर या आंब्याची चव कोणी आयुष्यभर विसरणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा अत्यंत महागडा आंबा आहे. त्यामुळे अगदी सर्वसामान्य नागरिक या आंब्याला खरेदी करू शकत नाही. दक्षिण पूर्व आशियातील काही भागांमध्ये आढळतो. या आंब्याची किंमत देखील खूप आहे आणि तसेच चवीला देखील खूप चांगला आहे. त्यामुळे हा आंबा पिकवणारे लोकं हा आंबा विकतही नाही.
भारतातील मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने त्याच्या बागेमध्ये या आंब्याचे झाड लावले होते. या झाडाच्या संरक्षणसाठी त्या व्यक्तीने चार रक्षक आणि धोकादायक कुत्री ठेवली होती. कारण काही वर्षांपूर्वी हा आंबा चोरीला गेल्याची बातमी आलेली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याची किंमत प्रति किलो 2.70 लाख एवढी आहे. आता तुम्हीच विचार करा एवढा महागडा आंबा कोण कशाला विकत घेईल. म्हणजेच हा एक आंबा 10 हजार रुपयांना मिळतो. परंतु असे अनेक लोक आहेत जे बाजारात हे आंबे विकत घेतात. या आंब्याचे वजन सुमारे 350 ग्रॅम एवढे असते. त्याचप्रमाणे त्यात साखरेचे प्रमाण 15% पेक्षा कमी असते.
आंबा खास पद्धतीने पिकवला जातो आंब्याच्या झाडावर फळ दिसल्यानंतर प्रत्येक फळाला जाळीच्या कापडाने बांधले जाते. यामुळे त्याचा रंगवेगळा आहे. जांभळ्या रंगाचा हा आंबा दिसायला अत्यंत सुंदर आणि चवीला चविष्ट देखील आहे.