Sangli Samachar

The Janshakti News

नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करा - जिल्हाधिकारी



सांगली समाचार दि. २ एप्रिल २०२४
सांगली - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत सर्व स्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीप कार्यक्रम आढावा व नियोजनाबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निता शिंदे, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, जि.प. उपपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, गत निवडणुकीत राष्ट्रीय सरासरी पेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रमाव्दारे जनजागृती करावी. मतदान केंद्र, गाव व तालुका स्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करावी. महाविद्यालय, पेट्रोल पंप, एसटी महामंडळ बसस्थानक, बसेस, पोस्ट ऑफीस, चावडी, मंगल कार्यालये, मोठे समारंभ आदी ठिकाणी पोस्टर, स्टीकर, ऑडिओ जिंगल्स, नाविण्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करावी. तसेच जिल्ह्यातून किमान एक लाख संकल्प पत्रे भरून घ्यावीत. यामध्ये 50 टक्क्यापेक्षा अधिक महिलांचा समावेश असावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 


स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे म्हणाले, तालुकास्तरावर मोठी रांगोळी, ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी असते त्या ठिकाणी पोहोचून मतदार जनजागृती करावी. त्याचबरोबर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. तसेच वाढता उन्हाळा लक्षात घेता नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टीने सकाळी कार्यक्रमाचे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात याव्यात. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी रांगोळी स्पर्धा, सायकल रॅलीचे नेटके आयोजन करून मतदार जनजागृती मोठ्या प्रमाणावर करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळीस तालुकास्तरीय नोडल अधिकारी उपस्थित होते.