| सांगली समाचार वृत्त |
जामखेड, दि.१४ एप्रिल २०२४ - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हेरगिरासाठी बहिर्जी नाईक यांनी अनेक कला विकसित केल्याचे दाखले आपल्याला इतिहासात मिळतात. त्यांनी हेरगिरी करताना कधी पक्षांचे आवाज, कधी लोककलेचा आधार तर कधी वेगवेगळ्या वाद्याच्या आवाजातून गुप्त संदेश देण्यात येत होते. अशीच एक लोककला म्हणजे करपावली कला.
या कलेत दोन माणसे एकमेकापासून लांब उभी राहून फक्त हाताच्या बोटांनी खुणा करून एकमेकांची भाषा ओळखत असतात. काही लोक फिरून या कलेच्या माध्यमातून दोन पैसे कमावत आहेत. मात्र, काळाच्या ओघात ही लोककला राजाश्रयाअभावी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, अशी खंत कल्याण शिंदे, विजय सावंत, सुभाष शिंदे यांनी व्यक्त केली.
एकमेकांशी संवाद साधणे ही एक कला आहे. त्या कलेला शब्दांची जोड असावी लागते. मात्र, शब्दही न बोलता केवळ बोटांनी हातवारे करून आपल्याकडील गुप्त माहिती समोरच्या व्यक्तीला सांगण्याची कला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून सुरूआहे. मूळचे निंबोळी (ता. भोकरदन, जि. जालना) येथील रहिवासी असलेले कल्याण शिंदे, विजय सावंत, सुभाष शिंदे हे तिघे गेल्या पंधरा दिवसांपासून जामखेड भागात वास्तव्यास आहेत.
करपल्लवी अर्थात करपावली ही भाषा शिवकाळापासून किंबहुना त्या अगोदरपासून प्रचलित आहे. शत्रूच्या गोटात जाऊन माहिती काढण्याचे काम त्याचबरोबर शत्रूसमोरच सहकाऱ्यांशी न बोलता हाताच्या हालचालीवरून करून निरोप पोहोचवण्याचे काम या भाषेतून होत असे. आता ही भाषा अवगत असणारे लोक फार कमी आहेत. हे लोक गावोगाव जाऊन तिथे या भाषेच्या माध्यमातून लोकांना माहिती देतात. त्यातून मिळणाऱ्या रोख रक्कम अथवा धान्यरूपी वस्तूतून याची गुजराण होते.
करपल्लवी भाषा अवगत असलेले कल्याण शिंदे, विजय सावंत, सुभाष शिंदे हे ज्यावेळी आपली कला सादर करत होते, त्या वेळी काहीही न बोलता समोरचा काय बोलतो आहे हे ओळखत होते. ही कला पाहून उपस्थित लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. गळ्यात कवड्यांची माळ, टाळ, तुणतुणं आणि संभळ घेऊन हे कलाकार आपली कला सादर करत आहेत. शासनाने कोणत्याही प्रकारचे साहाय्य आम्हाला केले नाही. ही पण एक लोककला असून शासनाने आम्हाला मदत करावी, अशी अपेक्षा कल्याण शिंदे, विजय सावंत, सुभाष शिंदे या कलाकाराने प्रभातशी बोलताना व्यक्त केली.
आम्हाला शेती नाही. त्यामुळे राज्यभर फिरून ही कला सादर करावी लागते. पण आता लोक पहिल्यासारखे राहिले नाहीत. आमच्या कलेला राजाश्रय मिळत नाही. शिवकालीन भाषा जिवंत ठेवण्याचे काम आम्ही जरी करत असलो, तरी कुटुंबाची गुजराण करताना ओढाताण होते. या कलेवर आपला प्रपंच चालणार नाही, या जाणिवेतून आमची पुढची पिढी ही कला शिकायला तयार नाही. शिक्षण घेऊन वेगळे काही तरी करू, हा त्यांचा पक्का निर्णय आम्हालाही मान्य करावा लागतो आहे.
– कल्याण शिंदे, कलाकार