yuva MAharashtra चंद्रहार पाटील यांच्यासाठी जयंत पाटील मैदानात!

चंद्रहार पाटील यांच्यासाठी जयंत पाटील मैदानात!



सांगली समाचार  - दि. ११ एप्रिल २०२४
सांगली - लोकसभा निवडणुकीची राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीने गुढी पाडव्यादिवशी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन राज्यातील ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. 'राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाकरे गटाच्या उमेदवाराठी मैदानात उतरले आहेत. 

महाविकास आघाडीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांना पाटील यांनी प्रचाराबाबत सूचना दिल्या. यावेळी जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली. 


"आपल्या मतदारसंघात आपल्या शेवटच्या मतदारापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे. आपल्या बुथवरील मतदानाचा अभ्यास करा. आपला नवा उमेदवार शिवसेनाउद्धव ठाकरे गटाचा आहे, आपल्या उमेदवारासाठी सर्वांनी काम करायचं आहे. तुमच्या घरी कोण चहा घेऊन गेले, असले प्रकार मला चालणार नाही. ते आले घरात बसले आम्ही काय करु. तसला धंदा जरा बंद करा', असा सज्जड दम जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम आहे, आपल्या बुथवर प्लस मतदान झालं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करा, असंही पाटील म्हणाले. 

"काँग्रेसने काढलेल्या जाहीरनाम्यात अनेक चांगल्या घोषणा केल्या आहेत. त्या मतदारांना पटवून सांगा. आज आपल्या देशात अन्नधान्यावरही टॅक्स द्यावा लागतो. परवा लाईट बील वाढलं, जीएसटी १८ टक्के आहे. देशावर कर्ज २१० लाख कोटी रुपयांचे झाले आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात हेच कर्ज ५६ लाख कोटी होते. हे कर्ज फेडण्यासाठी निवडणुकीनंतर १८ चे २१ टक्के केले तर आश्चर्य वाटणार नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला. 

देशावर कर्ज मोठ्या प्रमाणावर वाढले

"बँकेत पैसे अवाढव्य कापले जातात. मेसेज सुविधेसाठी दर महिन्याला १८ रुपये कापले जातात. स्टेट बँक ऑफ इंडियात ५० कोटी खाती आहेत. क्रेडीट कार्डवरही दोन टक्के फी आहे. बाहेरच्या देशात सेवेला अर्धा टक्के आहे पण, आपल्या देशात दोन टक्के आहे. असं का तर २१० लाख कोटी कर्ज आहे त्या कर्जात देशातील धनिकांना, श्रीमंतांना, उद्योगपतींना २५ लाख कोटी रुपयांच्या सवलती कर्जमाफ्या दिल्या आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत जो खड्डा पडला आहे तो भरुन काढण्यासाठी या बँकांची परिस्थिती दुरुस्त व्हावी म्हणून बँकांना या सर्व्हिस चार्जेस लावायचे सगळे अधिकार देण्यात आले आहेत, असा आरोपही जयंत पाटील यांनी भाजपावर केला.