yuva MAharashtra काळाने वेळ बदलली! राज ठाकरे धनुष्यबाणाला, तर उद्धव ठाकरे काँग्रेसला मतदान करणार

काळाने वेळ बदलली! राज ठाकरे धनुष्यबाणाला, तर उद्धव ठाकरे काँग्रेसला मतदान करणार



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२१ एप्रिल २०२४
कधी कोण राव होईल आणि कधी कोण रंक... हा सारा काळाचा महिमा अगाध असतो. तो कधी काय करेल सांगता येत नाही. असाच एक योगायोग यंदाच्या लोकसभा निवडणुकीत येणार आहे. राज ठाकरेंना शिवसेना सोडून जवळपास १८ वर्षे झाली. तर उद्धव ठाकरेंकडून शिवसेना जाऊन दोन वर्षे झाली आहेत. या काळाच्या महिम्याने अशी काही चक्रे फिरवली आहेत, की राज ठाकरे आता शिवसेनेला मतदान करणार आहेत. तर ठाकरे काँग्रेसला. 

खरेतर साडे चार वर्षांपूर्वीच आजच्या या राजकीय परिस्थितीची स्क्रीप्ट लिहिली गेली होती. उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाशी फारकत घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जवळ करत सत्ता स्थापन केली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणत होते, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. ते त्यांचे वक्तव्य अडीच वर्षांनी खरे ठरले. किंबहुना त्यांनी ते खरे केले. 


उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली. फुटली म्हणजे ठाकरेंनाच शिवसेनेतून बाहेर केले गेले. एकनाथ शिंदेंनी आमदार, खासदार सोबत घेऊन शिवसेनाच आपल्या नावावर करून घेतली. सोबत भगवा आणि धनुष्यबाणही घेतला. १८ वर्षांपूर्वी शिवसेनेतून राज ठाकरे वेगळे झाले होते. त्यांनी मनसेची स्थापना केली होती. पहिली निवडणूक वगळता राज यांच्या मनसेला घवघवीत यश संपादन करता आले नाही. आज ते भाजपाला बिनशर्त पाठिंबा देऊन बसलेत. 

काळाने अशी काही कांडी फिरवलीय की आज राज ठाकरे शिवसेनेच्या धनुष्यबाणाला आणि उद्धव ठाकरे काँग्रेसला मतदान करणार आहेत. उद्धव ठाकरेंचा मतदार संघ मविआमध्ये काँग्रेसला सुटला आहे. यामुळे तिथे ठाकरेंना काँग्रेसला मतदान करावे लागणार आहे. तर राज ठाकरेंच्या मनसेचा उमेदवार नसून त्यांच्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असणार आहे. यामुळे राज ठाकरेंना १८ वर्षांनी धनुष्यबाणाला मतदान करण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकांत मनसेचा उमेदवार नसला तरी राज यांनी मतदान केले आहे. परंतु ते कोणाला केले हे फक्त त्यांनाच माहिती आहे. परंतु आता राज हे धनुष्यबाणाला मतदान करतील हे खुद्द राहुल शेवाळे यांनीच काल स्पष्ट केले आहे. 

उद्धव आणि राज या दोघांचेही मतदारसंघ वेगवेगळे आहेत. उद्धव ठाकरे उत्तर मध्य मुंबईमधून मतदान करणार आहेत. तर राज ठाकरे हे दक्षिण मध्य मुंबईमधून मतदान करणार आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे युतीच्या उमेदवाराला मतदान करायचे. आता ते काँग्रेसला मतदान करणार आहेत.