सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४
मुंबई - जगात असे किती अभागी लोक आहेत, ज्यांना नैसर्गिक किंवा अपघातानं झालेल्या छोट्याशा इजेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जगात लाखो अंध लोक आहेत. अनेकांना अपंगत्व आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वसामान्य जगण्यावरच त्याचा विपरीत परिणाम होतो. यात या लोकांची काहीच चूक नाही, पण त्यामुळे अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी त्यांना संघर्ष करावा लागतो आणि त्यामुळे ते मागे पडतात. जगण्यापासून ते मरणापर्यंत त्यांना अनंत यातना सोसाव्या लागतात.
अलीकडे वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या सहायानं त्यांच्या अडचणी तशा कमी झाल्या, पण तरीही त्यांच्या मागचं शुक्लकाष्ठ कधी थांबलं नाही, ते नाहीच! पण सध्या तंत्रज्ञान ज्या वेगानं भरारी घेत आहे, ते पाहता, अनेक लोकांना आता सर्वसामान्य आयुष्य जगता येऊ शकेल, अशी आशा जागृत झाली आहे.
इलॉन मस्क अनेक कारणांनी चर्चेत असतात, पण तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते अगदी नवनवीन प्रयोगही सातत्यानं करीत असतात. मस्क यांची स्टार्टअप कंपनी 'न्यूरालिंक'नं याच वर्षाच्या जानेवारी महिन्यात एका रुग्णाच्या मेंदूत न्यूराचिप बसवली होती. या पेशंटला आठ वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता आणि त्याला अर्धांगवायू झाला होता. त्याचं चालणं-फिरणंही बंद झालं होतं. साध्या साध्या गोष्टींसाठीही त्याला इतरांवर अवलंबून राहावं लागत होतं. नोलँड अरबॉघ त्याचं नाव.
या नोलँडनं 'एक्स'वर नुकतीच एक पोस्ट टाकली. याच पोस्टमुळे सध्या जगभरात नोलँडचं, पण त्याहीपेक्षा इलॉन मस्क आणि त्यांच्या न्यूरालिंकचं नाव गाजतं आहे. तुम्ही म्हणाल, 'एक्स'वर पोस्ट टाकली, त्यात काय एवढी फुशारकी? किंवा मग ती पोस्ट वादग्रस्त होती का? किंवा त्यात त्यानं काही जाहीर केलं होतं का? - तर तसं काहीही नाही, तरीही ही पोस्ट, नोलँडची ती कृती गाजली, कारण ही पोस्ट लिहिताना त्यानं आपल्या कोणत्याही अवयवाचा दृष्य स्वरूपात वापर केला नव्हता! म्हणजे त्यानं ही पोस्ट हातानं टाइप केली नव्हती, तोंडानं बोलून ती पोस्ट स्क्रीनवर उमटवली नव्हती किंवा इतर कोणाची मदतही घेतली नव्हती. नोलँडनं एक्सवर जी पोस्ट केली ती त्यानं फक्त मनातल्या मनात विचार करून त्याद्वारे पोस्ट केली होती! म्हणजेच आपल्याला काय मजकूर पोस्ट करायचा आहे, याचा त्यानं फक्त मनातल्या मनात विचार केला! झालं, तो मजकूर स्क्रीनवर टाइप झाला आणि एक्सवर पाठवलाही गेला!
त्याही पुढची गोष्ट म्हणजे नाेलँडनं ऑनलाइन चेस खेळतानाचा एक व्हिडीओही शेअर केला. त्या पोस्टमध्ये तो म्हणतो, चेस (बुद्धिबळ) हा माझा आवडता खेळ, पण तो खेळणंही मी सोडून दिलं होतं, कारण मला आता खेळताच येत नव्हतं. पण मेंदूत न्यूराचिप बसविल्यानंतर मी आता पुन्हा चेस खेळू शकतोय! मी आता फक्त विचार करतो आणि तसं घडतं!
नोलँड, इलॉन मस्क आणि न्यूरालिंक यांची सध्या जगभरात चर्चा आहे ती यामुळेच! कारण पुढच्या एका नव्या संशोधनाची, लक्षावधी अपंग लोकांना वरदान ठरण्याची ही नांदी आहे. अर्थात आत्ता हा प्रयोग फक्त चाचणीच्या स्वरूपात आहे. हा प्रयोग जर संपूर्णपणे यशस्वी झाला तर ज्यांचा मेंदू विकलांग झाला आहे, ज्यांना संवाद साधता येत नाही, त्यांना इतरांशी 'बोलणं' सहजशक्य होईल. अर्धांगवायूमुळे जे रुग्ण हिंडू-फिरू शकत नाहीत, तसंच ज्यांना अंधत्व आहे, जे काहीच पाहू शकत नाहीत, असे जगातले कोट्यवधी लोक आता संगणकाच्या मदतीनं 'पाहू' शकतील, त्यांना 'दृष्टी' प्राप्त होईल! ते लिहू, बोलू, 'चालू' शकतील! आणि संगणकही हाताळू शकतील! या अर्थानं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे. संगणक आणि ती व्यक्ती यांच्यातली ही एक प्रकारची टेलिपथी आहे.
न्यूरालिंक कंपनीनं या चिपचं नाव 'लिंक' ठेवलं आहे. ही चिप म्हणजे नाण्याच्या आकाराचं एक छोटंसं उपकरण आहे. मानवी मेंदू आणि संगणक किंवा मोबाइल यांच्यात या चिपद्वारे थेट संवाद साधला जातो. रुग्णांसाठी ही चिप देवदूत ठरण्याची शक्यता आहे.
मेंदूतील चिप बाहेरून होईल चार्ज!
समजा, एखाद्याला अर्धांगवायू झालेला आहे. अशा व्यक्तीच्या मेंदूत ही चिप बसवली, तर नुसत्या विचारांनी तो आपल्या संगणकाचा माऊस, कर्सर सरकवू शकेल. मेंदूच्या आदेशानुसार आपण आपले हात, पाय हलवतो, तसं नुसत्या विचारांनी ती व्यक्ती आता आपल्या इच्छा प्रत्यक्षात आणू शकेल! ही चिप मेंदूत इम्प्लान्ट करण्यासाठी रोबोटिक प्रणाली वापरण्यात येईल. पण मेंदूतली ही चिप जोपर्यंत चार्ज असेल, तोपर्यंतच काम करेल. - अर्थात त्यासाठी वायरलेस चार्जरही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मेंदूतल्या चिपची बॅटरी बाहेरूनच चार्ज होईल !