| सांगली समाचार वृत्त |
नागपूर, दि.१४ एप्रिल २०२४ - आपल्या साैरमंडळात जसा सूर्य आहे, तसे आपल्या आकाशगंगेत अशाप्रकारचे अनेक सूर्य आहेत. त्यातीलच एका महाकाय जाेडताऱ्याचा येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत अंतराळात महास्फाेट हाेणार आहे. ही घटना पृथ्वीच्या ३००० प्रकाशवर्ष दूर हाेत असली तरी स्फाेटातून प्रचंड ऊर्जा बाहेर फेकली जाणार असल्याने पृथ्वीवरून उघड्या डाेळ्यांनी हा स्फाेट पाहता येणार आहे. ही घटना ७९ वर्षाने एकदा हाेत असल्याने ती पाहण्याची संधी आयुष्यात एकदाच मिळते.
रमन विज्ञान केंद्र व तारामंडळाचे खगाेल शिक्षक महेंद्र वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार 'टी-काेराेने बाेरियालिस' असे या ताऱ्याचे नाव आहे. श्वेतबटू (व्हाईट ड्वार्फ) आणि महाकाय लाल तारा (रेड जाॅयंट) अशा दाेन ताऱ्यांनी मिळून हा तारा बनला असल्याने त्याला जाेडतारा असेही म्हटले जाते. यातला श्वेतबटू हा मृत तारा असून आकाराने सूर्यापेक्षा लहान असला तरी वजनाने अधिक आहे. या श्वेतबटूमधील एक चम्मच मटेरियल हजाराे टनाचे असते. दुसरा लाल तारा हा सुद्धा त्याच्या अंताकडे जात आहे. म्हणजे त्याच्यातील हायड्राेजन संपत चालले असून प्रसरण पावत असल्याने आपल्या सूर्यापेक्षा कितीतरी माेठा हाेत आहे. आपल्या सूर्याची अवस्थासुद्धा साडे चार अब्ज वर्षानंतर अशीच हाेणार आहे. हे दाेन्ही तारे एकमेकाभाेवती भ्रमण करीत असून एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २२७ दिवस लागतात.
काय हाेत आहे ?
नासा संस्थेद्वारे जारी केलेल्या माहितीनुसार श्वेतबटू ताऱ्याचे गुरुत्वाकर्षण अत्याधिक आहे. त्यामुळे महाकाय लाल ताऱ्यातून निघणारे मटेरियल सातत्याने श्वेतबटूवर पडत आहे. ते टी-काेराेने बाेरियालिसच्या पृष्ठभागावर साचले असून त्यातून 'न्यूक्लियर फ्यूजन रिअॅक्शन' हाेत आहे. त्यामुळे त्याचे तापमान काही दशलक्ष पटीने वाढले आहे. त्यातूनच थर्माेन्यूक्लियर प्रक्रिया हाेऊन एखाद्या अनुबाॅम्बसारखा प्रचंड स्फाेट हाेणार आहे. हा स्फाेट आठवडाभर दिसत राहिल, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. यातून आपल्या सूर्याच्या ऊर्जेपेक्षा एक लाख पट अधिक ऊर्जा बाहेर पडण्याचा अंदाज आहे.
स्फाेट हाेण्याचा अंदाज कशामुळे ?
नासाच्या मेटराॅइड एन्व्हायर्नमेंट प्राेग्रामचे व्यवस्थापक विल्यियम कूक यांच्या मते ताऱ्याचा स्फाेटा हाेण्यापूर्वी श्वेतबटू काहीसे धुसर हाेतात. हाच बदल टी-काेराेने बाेरियालिस या ताऱ्यामध्ये मार्च २०२३ पासून बघायला मिळत आहे. यापूर्वी १९४६ साली आणि त्यापूर्वी १८६६ साली अशाप्रकारे ताऱ्याचा स्फाेट (नाेवा एक्सप्लाेजन) नाेंदविण्यात आला हाेता.
आपल्या साैरमालेवर काय परिणाम ?
आपल्याच मिल्की वे आकाशगंगेत हा स्फाेट हाेणार असल्याने आपली पृथ्वी असलेल्या साैरमालेवर परिणाम हाेईल, अशी भीती व्यक्त हाेते. मात्र खगाेल वैज्ञानिकांच्या मते आपल्या साैरमंडळावर याचा काहीही परिणाम हाेणार नाही. स्फाेटाची ऊर्जा आकाशगंगेत विलिन हाेईल आणि प्रकाश तेवढा आपल्याला पाहता येईल.