मुंबई - राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी घेतल्या जात असलेल्या राजकीय बैठकांची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून, याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिली. या नोटिसीचे उत्तर आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तेव्हापासून देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सतत राजकीय बैठका होत आहेत. या बैठका तात्काळ थांबवाव्यात हा आचारसंहितेचा भंग आहे निवडणूक आयोग याची अजूनही दखल घेत नाही, अशी तक्रार प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी 'एक्स' या माध्यमातून या तक्रारीबाबत चोकलिंगम यांना विचारले असता, त्यांनी या तक्रार प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली असून, या नोटीसीला उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. दरम्यान राज्यात 16 मार्च 2024 पासून ते 7 एप्रिल 2024 या दरम्यान सी व्ही एल या ॲपवर आचारसंहिता भंगाच्या 1,894 तक्रारी प्राप्त झाले असून त्यातील 1,887 तक्रारी निकालात काढण्यात आल्याचे चोकलिंगम यांनी सांगितले.