| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि.१७ एप्रिल २०२४
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला तात्काळ चर्चेसाठी नागपुरात बोलावल्याने मी आलो. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासोबतही फोनवरून चर्चा झाली. यातून लवकर तोडगा काढावा, जेणेकरून सांगली लोकसभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक ठोस पाऊल घेता येईल, अशी भूमिका आम्ही मांडली, असे प्रतिपादन काँग्रेस नेते व माजी मंत्री विश्वजित कदम यांनी माध्यमांशी बोलताना केले.
सांगलीत विशाल पाटील यांनी अर्ज दाखल केला असून काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नाही. मात्र, शेवटच्या क्षणालाही एबी फॉर्म जोडला जाऊ शकतो. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी दोन अर्ज भरले आहेत. एक काँग्रेस पक्ष आणि एक अपक्ष, राज्याच्या आणि देशाच्या ज्येष्ठ नेत्यांची जबाबदारी आहे. सांगली जिल्ह्याचा आमदार म्हणून आम्ही सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसला मिळावी, त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला. पण सध्या सांगलीची परिस्थिती उद्भवली आहे, त्याला सगळे आपण साक्षीदार आहोत.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी अत्यंत चांगले वातावरण आहे. यासाठी काय योग्य निर्णय घ्यायचे ते ज्येष्ठांनी ठरविणे गरजेचे आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहेत. यातून काय घडतं ते त्या त्या निवडणुकीचा शेवटच्या क्षणापर्यंत कळत असते. त्यामुळे मी यावर जास्त बोलणार नाही. मी जी काही परिस्थिती मांडली आहे. त्यातून राज्याचे आणि देशाचे नेते नक्कीच मार्ग काढतील. महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी धर्म पाळायला पाहिजे, अशा सूचना काल आमच्या वरिष्ठांनी आम्हाला दिल्या आहेत, असे कदम यांनी सांगितले.