| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१७ एप्रिल २०२४
सांगली जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील कडेगाव, खानापूर, तासगाव या दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरलेल्या ताकारी उपसा सिंचन योजना २० एप्रिलपासून सुरू करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी दिल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली. या बाबत सांगली पाटबंधारे मंडळाची बैठक शनिवारी (ता. १३) झाली.
ताकारी योजनेचे दुसरे रब्बी आवर्तन २२ जानेवारी ते १७ मार्च असे सलग ५६ दिवस सुरू होते. हे पाणी मुख्य कालव्याच्या शेवटी १४४ किलोमीटरवरील सोनी-भोसे (ता. मिरज) पर्यंत पोहोचल्यावर बंद करण्यात आले. दरम्यान, पंधरा दिवसांपासून वाढलेल्या उन्हामुळे सिंचनक्षेत्राला सतत पाणी द्यावे लागत असल्याने जमिनीतील पाणीपातळी प्रचंड खालावली आहे.
विहिरी व कूपनलिका सांगळ्यावर आल्या आहेत. पिके कशी जगवायची, या विवंचनेत शेतकरी आहेत. यंदा पाऊसच झाला नसल्याने लाभक्षेत्रातील बहुसंख्य गावांना पिण्याच्या पाण्यासाठी ताकारी पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. पाणी कमी झाल्याने बऱ्याच गावांच्या योजनांवर परिणाम झाला. आठच दिवस पाणी पुरले असते.
शिवाय कोयना धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही ताकारीचे पाणी का सुरू होत नाही, असा प्रश्न लाभक्षेत्रातून विचारला जात आहे. पाणी वेळेत न आल्यास शेती उद्ध्वस्त झाली असती. ताकारी योजना लवकर सुरू व्हावी, अशी सर्वदूर लाभक्षेत्रातून मागणी सुरू होती.
त्यास अनुसरून सांगली पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. त्यात सद्यःस्थितीतील टंचाईवर तत्काळ उपाययोजना होण्यासाठी २० एप्रिलपासून ताकारी योजना सुरू होण्याचे दृष्टीने कार्यवाहीची सूचना अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी ताकारी अधिकाऱ्यांना दिले. पाणी सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजनाताकारी योजना सुरू करण्यापूर्वी ६६ इलेक्ट्रिक व पंपगृहातील तांत्रिक कामे होणे आवश्यक आहे. किमान आठ दिवसांचा वेळ अपेक्षित आहे. २० तारखेला निश्चित पाणी सुरू होईल.