राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अशामध्ये आजही अनेक जिल्ह्यांना विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली त्यामुळे रस्ते बंद पडले. तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे उकाड्यामुळे नागरिकांचे हाल झाले. तसंच, शेतपिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे.
कोल्हापूर -
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि हातकणंगलेमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या महिनाभर उखाड्यांने हैराण झालेल्या जयसिंगपूरकरांना या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याचा पारा 39 अंशांवर पोहचला होता. या पावसामुळे जयसिंगपूर-सांगली मार्गावरील अनेक झाडं उन्मळून पडली. त्यामुळे जयसिंगपूर-सांगली महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तीन तासांपासून जयसिंगपूर-सांगली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.
सांगली -
सांगली जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर मिरज पूर्व भागातील अनेक गावांना पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली. अवकाळी पावसामुळे लिंगनूर, शिंदेवाडी, मल्लेवाडी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली त्यामुळे वाहतुकीची गैरसोय झाली. तसेच या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. तसंच काही गावात मोठा पाऊस झाल्याने शेत शिवारात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे भाजी पाल्याच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. बेबीकॉर्न, मका पिक वादळी पावसामुळे जमीन दोस्त झाले आहे.