yuva MAharashtra जीवाचे रान करून म्हैसाळ विस्तारित योजना दोन वर्षात पूर्ण करत जतचा पाणी प्रश्न कायमचा सोडवणार - संजय काका पाटील

जीवाचे रान करून म्हैसाळ विस्तारित योजना दोन वर्षात पूर्ण करत जतचा पाणी प्रश्न कायमचा सोडवणार - संजय काका पाटील



सांगली समाचार- दि. ११ एप्रिल २०२४
जत - आपल्या सगळ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असणारी म्हैसाळ विस्तारित योजना जीवाचे रान करून दोन वर्षात पूर्ण करणार आणि जतचा पाणी प्रश्न कायमचा सोडवणार आणि मगच २०२९ ला लोकसभेला मत मागायला येणार,असा निर्धार खासदार संजयकाका पाटील यांनी जतच्या जनतेपुढे व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जत येथील भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यात ते बोलत होते.
या मेळाव्यास पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. पद्माकर जगदाळे, भाजप जत विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तमनगौडा रवि पाटील, ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक प्रकाश जमदाडे, डॉ. रविंद्र आरळे, राष्ट्रवादी काँग्रेस जत तालुका अध्यक्ष शुभम पवार, रासप जिल्हाध्यक्ष किसन टेंगले, शिवसेना शिंदे गट जत विधानसभा क्षेत्र प्रमुख निवृत्ती शिंदे, आरपीआय चे संजय कांबळे, प्रभाकर जाधव, रामन्ना जिवनावर, सच्चिदानंद तेली, गुंडू पाटील, तेजस्विनी व्हणमाने, नगरसेवक विक्रम ताडे यांच्यासह जत तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
संजयकाका पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपले आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. जत तालुक्यातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी आम्ही जीवाचे रान करत आहोत. आपल्या जिवन मरणाचा प्रश्न असणारी म्हैसाळ विस्तारित योजना दोन वर्षात पूर्ण होणार आहे. पहिल्यांदा हजार कोटी चे टेंडर निघाले होते त्याचे काम सुरू आहे. आता अजून दुसरे एक हजार कोटी चे टेंडर निघाले आहे. त्याचे काम आठ दिवसात सुरू होईल. ही योजना पूर्ण झाल्या शिवाय आपल्याला पुरेसे व मुबलक पाणी मिळणार नाही. म्हैसाळ योजनेच्या विज बिलाचा प्रश्न मिटला आहे. त्यासाठी देशातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा मोठा प्रकल्प संख येथे सुरू होत आहे. त्याकरिता १५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. विजेचे बिल कृष्णा खोरे मधून ८१ टक्के आणि आपण १९ टक्के असे भरतो. त्यामुळे सर्व आवर्तने वेळेत होत आहेत. आपण केलेल्या विकास कामांच्या बळावर आपण ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहोत.
दोन वर्षात जतचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आणि मगच २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत मते मागायला येईन, असा निर्धार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला.