| सांगली समाचार वृत्त |
सांगली दि.२० एप्रिल २०२४
खरंच कमाल झाली राऊत साहेबांची... ४० वर्षे पत्रकारितेत, नंतर आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलेल्या माणसाने काय आणि कसे बोलावे ? हा खरं तर ज्याचा त्याचा प्रश्न ! पण बोलत असताना किमान वस्तुस्थितीचे भान ठेवून तरी बोलायला हवे. संजय राऊत यांनी 'तोंड उघडले की केवळ वाद' हेच समीकरण अलीकडील काळात दिसून येत आहे. त्यांच्या अशा बेताल वक्तव्याने ब-याचदा उद्धव ठाकरे यांना तोंडघशी पडावे लागले आहे. शिवसेना फुटण्यासाठी राऊत साहेब कारणीभूत असल्याचे बोलले जाते. असे असूनही उद्धव साहेब यांना कसे काय सहन करतात ? असा प्रश्न जनतेतून विचारला जातोय.
आज राऊत साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांना चक्क पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नेऊन उभे केले. कशाच्या जोरावर ? हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. महाराष्ट्र आणि देश पातळीवर सोडा. पण सांगलीतील त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना इतर पक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत. आता या कुबड्या घेऊनही पै. चंद्रहार पाटील विजयी होणार का ? याचे उत्तर ४ जूनला मिळेल. खरं तर, त्यांची वक्तव्ये कोणी गंभीरपणे घेत नाहीत. पण ते जर एखाद्याविरुद्ध बोलले, तर संबंधित व्यक्ती त्यांच्याविरुद्ध तुटून पडते. मग ते नारायण राणे साहेब असोत की नवनीत राणा. राणा यांच्या विरोधातील वक्तव्याने तर अवघा महिला वर्ग खवळलेला दिसून आला. आणि आता अशा वक्तव्याने जर शिवसेना व महाआघाडीतील उमेदवारांच्या मतावर परिणाम झाला तर काय ? हा ही सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न. आता याचे उत्तर महाआघाडी आणि शिवसेनेने शोधावे.