Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत मविआची धाकधूक वाढली, विशाल पाटलांचा नवा प्लॅन समोर, घेतला मोठा निर्णय



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१५ एप्रिल २०२४ -
सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता दिसत आहे. मविआने ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला दिली असून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. यावरून सांगली जिल्हा काँग्रेससह जिल्ह्यातील नेत्यांमध्ये नाराजी आहे. विशाल पाटील हे काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून मविआने तिकीट नाकारल्यानंतरही त्यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. विशाल पाटील हे मंगळवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आमदार विश्वजीत कदम यांनी वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. मात्र तरीही मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. यानंतर सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला.

विशाल पाटील यांच्या उमेदवारीसंदर्भात काँग्रेसने निर्णय घेतला नाही तर ते अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता आहे. मंगळवारी १६ एप्रिल रोजी विशाल पाटील अर्ज भरणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. काँग्रेसच्या चिन्हावरच लढण्यासाठी विशाल पाटील आग्रही असून जर निर्णय झाला नाही तर अपक्ष लढणार आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी आशा विशाल पाटील यांना आहे. मंगळवारी गणपती मंदिर ते काँग्रेस भवन अशी ऱॅली काढून शक्तिप्रदर्शन करत अर्ज भऱणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

विशाल पाटलांनी लावला काँग्रेसचा नवा फलक
काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बोर्डवरील काँग्रेस शब्द पुसला होता. त्याठिकाणी विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत येऊन पुन्हा नवा फलक लावला. त्यावेळी विशाल पाटील यांनी म्हटलं की, कार्यकर्त्यांना आमच्यावर राग काढावा, काँग्रेसवर नको. सांगलीच्या जागेबाबत आम्ही अजून सकारात्मक आहे, कार्यकर्त्यांनी पक्षावरील निष्ठा ढळू देऊ नये. महाविकास आघाडीचे नेते अजूनही ही जागा काँग्रेसला सोडण्याबाबत फेरविचार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.