yuva MAharashtra जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचा संयमी बाणेदारपणा काँग्रेसप्रेमींच्या हृदयाला भिडला, सर्वत्र कौतुक !

जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचा संयमी बाणेदारपणा काँग्रेसप्रेमींच्या हृदयाला भिडला, सर्वत्र कौतुक !



सांगली समाचार - दि. ४ एप्रिल २०२४
सांगली - ठाकरे शिवसेनेने काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केल्यानंतर, जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी जी संयमी, पण बाणेदार भूमिका घेतलेली आहे, तिचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

"आम्ही आमचे घर तुमच्या कोल्हापूरच्या भावाला दिले आहे, त्यामुळे तुमचे सांगलीतील घर आम्हाला हवे !" असा आडमूठा हटवादीपणा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी घेतला. राजकारणातील नवख्या पैलवानाला लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीत उतरवले. ठाकरे यांनी मिरजेतील आपल्या भाषणात, "आम्ही एक मर्द गडी तुम्हाला दिला आहे, आता त्याला दिल्लीत पाठवून, तुम्हीही मर्दपणा दाखवावा." अशी गर्जना मिरजेतील जाहीर सभेत केली. इथपर्यंत ठीक होतं... कारण जाहीर सभेत उपस्थितांच्या टाळ्या मिळवण्यासाठी असं बोलावंच लागतं. पण ज्या काँग्रेसच्या जागेवर आपण हक्क सांगतो आहोत, त्यांना विश्वासात न घेता, आणि आपण इथे दुबळे आहोत याची जाणीव असूनही, पक्षाच्या पहिल्या यादीत पै. चंद्रहार पाटील यांचे नाव समाविष्ट करून, आघाडी धर्माला तिलांजली दिली.

यानंतरही डॉ. विश्वजीत कदम, आ. विक्रमसिंह सावंत, पृथ्वीराज पाटील यांनी शिवसेनेशी अथवा पै. चंद्रहार पाटील थेट न भिडता, काँग्रेस पक्षाच्या राज्यातील नेत्यांसमोर शिवसेनेने केलेल्या आगळकीची तक्रार केली. सांगली काँग्रेसकडे राखण्यात आपण आमच्या पाठीशी ठाम उभे राहावे, असा आग्रह धरला. राज्य पातळीवरील काँग्रेस नेत्यांनी याला जोर देऊन, ठाकरेंकडे पक्षाची बाजू मांडली. पण ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. 


तेव्हा जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी, राज्य नेतृत्वासह दिल्लीच्या काँग्रेस पक्ष श्रेष्ठीसमोर आपली कैफियत मांडली. दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांनी शिष्टमंडळाची बाजू समजावून घेऊन, आपण मध्यस्थी करू, असा शब्द दिला. पण ठाकरेंनी दिल्लीश्वरांच्या शब्दालाही किंमत दिली नाही. उलट "आम्हाला देशाच्या पातळीवर नेतृत्व करायचे नाही, काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा अशी आमची इच्छा आहे." असे जाहीर करून, टाकलेल्या जाळ्यात काँग्रेस अडकली. यानंतर जिल्ह्यातील व राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सांगलीत 'मैत्रीपूर्ण लढती'चा प्रस्ताव दिला. पण यालाही राऊत-ठाकरेंनी धुडकावून लावले. कारण हा प्रस्ताव स्वीकारला तर आपला पराभव निश्चित आहे हे उघड होते. त्यामुळे "सांगलीत मैत्रीपूर्ण असेल, तर राज्यातही ४८ मतदार संघात मैत्रीपूर्ण लढत होऊन जाऊ द्या." असे आव्हान दिले. 

या साऱ्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील असो वा राज्यातील, काँग्रेस नेतृत्वाने जो संयमी बाणेदारपणा दाखवला तो काँग्रेस प्रेमी मतदारांना भावला असून, "उद्या मैत्रीपूर्ण असो वा अपक्ष... विशाल पाटील यांच्यासाठी ही जमेची बाजू असेल." गरज आहे ती विशाल पाटील यांनी लढण्याचा निर्णय झाला, तर सर्व काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी 'प्रामाणिकपणे' त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची... 

धोका आहे तो, भविष्यात विधानसभेसाठी तिढा टाकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही... पण आज दाखवलेला बाणेदारपणाच विधानसभेसाठीही उपयोगी पडणार आहे... कारण विधानसभा निवडणुकीच्या वेळेलाही झारीतील शुक्राचार्य, स्वतःचे नेतृत्व बळकट करण्यासाठी, पायात पाय घालण्याची वृत्ती सोडणार नाहीत... म्हणून विधानसभेत तुम्हाला जिंकायचे असेल तर गरज आहे, आत्ता लोकसभेसाठी खिंड लढवण्याकरिता एकसंघ राहण्याची... बाकी मतदार राजा हुशार आहे. कोणीही, कितीही, काहीही सांगितले तरी निवडणुकीत कोणाच्या नावासमोरील बटन प्रेस करायचे हे त्याने ठरवलेले आहे. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे... तोही ठामपणे, आक्रमकपणे...