सांगली समाचार - दि. ६ एप्रिल २०२४
सांगली - २०१४ आणि २०१९ च्या पराभवाचा बदला घेण्याच्या ईर्षेने, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ताकतीने पुढे आलेल्या विशालदादा पाटील यांची काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाली असताना, त्यांचा निवडणुकीतून पत्ता कट करण्यासाठी "कोल्हापूरच्या बदल्यात सांगली" ही हटवादी भूमिका घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेने राजकारणात नवख्या असलेल्या पै. चंद्रहार पाटील यांच्या हातात मशाल दिली. पण मशाली ऐवजी इथे वादच पेटला.
कारण मुद्दा होता तो दादा घराण्याच्या इभ्रतीचा. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेपासून इथं स्व. वसंतदादांचा वरचष्मा. केवळ सांगलीतच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील उमेदवार ज्या स्व. वसंतदादांनी ठरवले आणि निवडूनही आणले. त्यांच्या नातवांवर उमेदवारीसाठी मुंबई, दिल्ली वाऱ्या कराव्या लागत आहेत. याबाबतची चीड केवळ दादांच्या वारसातच नव्हे, तर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या काँग्रेसजनांच्या मनात आहे. तरीही गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व नेत्यांनी संयम पाळला.
प्रथम स्थानिक पातळीवर, त्यानंतर राज्य पातळीवर उद्धव ठाकरे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला गेला. केंद्रीय नेतृत्वानेही सामोपचारासाठी निरोप दिला. पण "आम्ही उमेदवारी जाहीर केली आहे आता माघार नाही." अशी गर्जना ठाकरे यांनी शिवसेनेची दुसरी यादी जाहीर करताना पत्रकार परिषदेमधून केली. इकडे राऊत सांगलीत येऊन मशालीला चेतवण्याचा प्रयत्न करून झाला. परंतु त्याची धग काही जाणवायला तयार नाही. याचे कारणही सर्वश्रुत आहे.
आता ठाकरेंनी येथे आपली ताकद नसताना उमेदवार का दिला ? याचे उत्तर केवळ काँग्रेसच्या नेत्यां-कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर सांगलीकर जनतेला ही ठाऊक आहे. सर्वप्रथम कोल्हापुरात आदरणीय शाहू महाराजांच्याकडे महाआघाडीतून निवडणूक लढवण्याची गळ घालण्यास कोण गेले ? कोल्हापुरात शिवसेनेची ताकत आहे हे ठाऊक असतानाही, वंदनीय शाहू महाराजांनी काँग्रेसचा हात का धरला ? ज्या 'मातोश्री'वर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोडा, पण भल्याभल्यांनाही सहजासहजी प्रवेश मिळत नाही, तेथे खानापूर-आटपाडी पुरते मर्यादित नेतृत्व असलेल्या भोळ्याभाबड्या पैलवानाच्या हातात शिवबंधन बांधण्यासाठी कसे पाचरण केले गेले ? यामागे ताकद कुणाची, हेही सर्वश्रुत आहे.
आता मुद्दा उपस्थित होतो येथे मशालीची धग का जाणवत नाही ? यामागील कारण डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रथम सांगलीत आणि नंतर राज्याच्या व देशाच्या राजधानीत वारंवार सांगितले आहे. तरीही ठाकरेंचा आवाज इतका बुलंद कसा ? तो कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्या मनामनांत स्फुलिंग का पेटवू शकला नाही ? कारण ज्या मशालीसाठी सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेकडून तेल पोहोचवले जात आहे, त्यामध्ये जर 'सत्व'च नसेल तर मशाल पेटणार कशी ? आणि धग जाणवणार कशी ?
काँग्रेसची मनधरणी करण्याच्या इराद्याने सांगलीत आलेल्या राऊताना, काँग्रेसचे नेतेच नव्हे तर कार्यकर्तेही भेटले नाहीत. मग त्यानी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या विरोधकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण तेथेही त्यांची निराशाच झाली. पै. चंद्रहार पाटील यांच्याबद्दल सहानुभूती असली तरी, खरी ताकद विशाल पाटील यांचीच आहे, असे अप्रत्यक्षपणे सुचवल्यामुळे राऊत यांना तेथूनही आश्वासनाशिवाय हात हलवत परत फिरावे लागले. कारण या मंडळींचा विरोध आहे तो संजय काकांना. विशाल पाटलांना नव्हे...
या साऱ्या पार्श्वभूमीवर शहाणे होऊन ठाकरे यांनी एक पाऊल मागे घ्यावे आणि राऊत किंवा ज्यांनी हा वाद पेटवला त्यांचे न ऐकता, विशाल पाटील यांच्या ऐवजी चंद्रहार पाटील यांनाच राज्यसभेत पाठवून हा वाद मिटवावा, असे काँग्रेसच्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे... पाहू, घोडा मैदान जवळच आहे. ठाकरे काय निर्णय घेतात !