Sangli Samachar

The Janshakti News

माघारीची चूक केली असती तर, सांगली बिनविरोध झाली असती - विशाल पाटील



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२५ एप्रिल २०२४
सांगली लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न होता. या निवडणुकीतून मी जर माघार घेण्याची चूक केली असती तर सांगली लोकसभा निवडणुक बिनविरोध झाली असती अशी टीका अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जत तालुक्यात ठिकठिकाणी झालेल्या जाहीर सभेत केली. 
जत तालुक्यातील रावळगुंडवाडी, दरिबडची येथे विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी बाजार समितीचे सभापती सूजय शिंदे, आप्पाराय बिराजदार, बसवराज बिराजदार, सरपंच बिराप्पा शिंदे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 


यावेळी बोलताना पाटील म्हणाले, कर्नाटक सीमेवर असलेल्या गावांनी पाण्यासाठी कर्नाटकमध्ये सहभागी होण्याचा इशारा देताच राज्य शासनाने सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र निष्क्रिय खासदार या निधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा निष्क्रिय खासदारांना घरी बसविण्याची हीच योग्य वेळ आहे. मालमत्ता, कारखाना विकत घेऊन स्वत:ची इस्टेट दुपटीने, चौपटीने वाढवत असताना सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. प्रतिक पाटील केंद्रीय मंत्री असताना म्हैसाळ योजना एआयबीपीमध्ये हस्तांतरित झाली. त्यानंतर हजारो कोटींचा निधी मंजूर झाला. दिल्ली, मुंबईतून सांगलीचा खासदार ठरत असेल तर सांगलीचा स्वाभीमान जागा करण्याची वेळ आली आहे. सांगलीची अस्मिता जपण्यासाठी जनतेने मला पुढे केले आहे.