| सांगली समाचार वृत्त |
कडेगाव - दि.२८ एप्रिल २०२४
सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी दिवंगत संपतराव देशमुख यांचे योगदान आहे. या जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ सारख्या योजनांना अनेक मंत्री असून देखील गती नव्हती, ती गती महा युतीचे सरकार आल्यावर आली, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. कडेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते, यावेळी कामगार मंत्री व पालकमंत्री सुरेश खाडे, संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख , जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, राजाराम गरुड, मकरंद देशपांडे, निता केळकर, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख आदी उपस्थित होते.
सर्वाधिक निधी दुष्काळी भागातील सिंचन योजनांना
फडणवीस म्हणाले, " आम्ही सत्तेत येण्यापूर्वी आमच्या विदर्भाला पश्चिम महाराष्ट्र्रात निधी जातोय असं वाटायचं, सत्तेत आल्यावर समजलं इथं निधी येतच नाही, इथं विदर्भाचा अनुशेष सांगितला जायचा, असं करून कुठेही निधी दिला जायचा नाही, मात्र महायुतीच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री झाल्यावर सर्वाधिक निधी दुष्काळी भागातील सिंचन योजनांना देऊन गती दिली. विस्तारित टेंभू आणि म्हैसाळ योजना हाती घेतल्या, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक निधी दिला म्हणून आम्ही हे काम करू शकलो, त्यामुळे मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी भाजपला मत द्या " असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केलं.
अन् देशमुखांनी स्पष्ट सांगितलं…
माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी आम्ही पक्षावर नाराज नाही, आम्हला पक्षाने खुप दिलं आहे, आम्हीही पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडली. आम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्ही नाराज नाही, तर विद्यमान संजयकाका पाटील यांनी आमच्या विरोधकांच्या मदतीने आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला, आमचे कार्यकर्ते आमचा स्वाभिमान आहेत, त्यांना धक्का लागलेला आम्ही सहन करणार नाही, असंही देशमुख यावेळी म्हणाले.
दिलेली सूचना लक्षात ठेवू !
देशमुख यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे तक्रार केल्यानंतर भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील म्हणाले, यापूर्वी आमच्यात काही राजकीय मतभिन्नता होती, मात्र मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचे आहे, त्यामुळे ही मतभिन्नता आम्ही दूर करू, व देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली सूचना लक्षात ठेवू असे आश्वासन विद्यमान खासदार आणि उमेदवार संजयकाका पाटील यांनी दिले.
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पाणीपट्टीचा दिलासा
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख म्हणाले, " सिंचन योजना चालवण्यासाठी अडचणी येत होत्या, शेतकऱ्यांना पाणीपट्टी अधिक होती, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ८१ टक्के कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि फक्त १९ टक्के पाणीपट्टी शेतकऱ्यांना ठेवली, याचा खुप मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे. आम्ही जी जी जबाबदारी दिली ती ती पार पाडली आहे, तुम्ही आमच्या पाठीशी राहा, असे आवाहन त्यांनी फडणवीस यांना केले, त्यानंतर फडणवीस यांनी देखील संग्राम यांना मी नेहमी पाठीशी असल्याचे आश्वस्थ केलं.