| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२२ एप्रिल २०२४
मार्च महिन्यात तेजस ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांनी तामिळनाडूत पसरलेल्या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरून गोल बुबुळे असलेल्या पालींच्या दोन आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचा शोध लावला होता. त्या संशोधनाची दखल फोर्ब्ज या मासिकाने घेतली आहे.
या संशोधनामध्ये तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि ईशान अगरवाल यांचा सहभाग होता. नव्याने शोधलेल्या दोन्ही पालींचा समावेश निमास्पिस कुळात करण्यात आला होता. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून सुरू असलेल्या भारतीय द्विपकल्पामधील पालींच्या सर्व्हेक्षणादरम्यान या पाली प्रथमतः आढळल्या. गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे वैशिष्ट्य आहे. रंग, आकार, मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील ट्युबरकलची रचना, जनुकीय संचाच्या वेगळेपणावरून दोन्ही पाली कुळातील इतरांपासून व एकमेकांपासून वेगळ्या ठरतात.
यातील निमास्पिस व्हॅनगॉगी या प्रजातीची विशेष दखल फोर्ब्ज मासिकाने घेतली आहे. या प्रजातीचं नाव थेट एका प्रसिद्ध चित्रकारावरून ठेवण्यात आलं आहे. ही प्रजात तामीळनाडूतील श्रीविल्लीपुथूर-मेघमलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळली. निमास्पिस व्हॅनगॉगी या प्रजातीचे नामकरण प्रसिद्ध चित्रकार वॅन गॉग यांच्या नावावरून केले आहे. या पालीच्या अंगावरील रंगसंगती वॅन गॉग यांच्या 'द स्टारी नाईट' चित्राशी मिळतीजुळती आहे. हा शोध अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असल्याचं फोर्ब्जने म्हटलं आहे.