yuva MAharashtra भारताला या यादीत मिळाला 'भोपळा', तरीही तुम्ही म्हणाल "अरे व्वा !"

भारताला या यादीत मिळाला 'भोपळा', तरीही तुम्ही म्हणाल "अरे व्वा !"



सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४
नवी दिल्ली  - भारत सातत्याने मोठी भरारी घेत आहे. भारताने विकासाचा मोठा पल्ला गाठला आहे. भारतीय अर्थव्यवस्था सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. लवकरच भारत तिसऱ्या क्रमांकावर असले असा दावा केंद्र सरकारसह अनेक तज्ज्ञ करत आहेत. अनेक विकसनशील देशांपेक्षा भारताने दमदार कामगिरी बजावली आहे. त्यातच या बातमीने पण तुम्ही खूश व्हाल. तर फ्रँकलिन टेम्पलटन या संस्थेने एक यादी जाहीर केली आहे. त्यात भारताला भोपळा मिळाला आहे. तुम्ही म्हणाल भोपळा मिळाल्यावर कसा आनंद साजरा करायचा? पण हे वृत्त वाचल्यावर तुम्हाला नक्कीच समाधान वाटेल…

भारताला मिळाला भोपळा

फ्रँकलिन टेम्पलटन ही जागतिक संस्था आहे. या संस्थेने जगातील मंदीची संभाव्यता, कोणत्या देशात मंदी येणार याविषयीची एक यादी तयार केली आहे. या यादीत भारत हा सर्वाधिक आश्वासक स्थितीत आहे. भारतात मंदीबाईचा फेरा येणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळेच या यादीत भारतात मंदी येण्याची शक्यता 0 टक्के असल्याचे म्हटले आहे. या यादीनुसार, विकसीत देशांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आणि फ्रांसमध्ये मंदीचा वरंवटा फिरण्याची दाट शक्यता आहे.


कुठे येणार मंदीचा फेरा

जर्मनीमध्ये सर्वाधिक मंदी येण्याची दाट शक्यता आहे. या यादीनुसार जर्मनी पुढील वर्षापर्यंत मंदी येईल. मंदी येण्याची शक्यता 73 टक्के आहे. इटलीमध्ये मंदी येण्याची शक्यता 65 टक्के आहे. मंदी येण्याची दाट शक्यता असलेला इंग्लंड हा तिसरा देश आहे. न्युझीलंड आणि कॅनडात मंदी येण्याची शक्यता 50-50 टक्के आहे. जागतिक महासत्ता अमेरिका पण मंदीच्या फेऱ्यात येईल. अमेरिकेत मंदीची शक्यता 45 टक्के आहे. स्पेन, जपान, दक्षिण कोरियासह चीनमध्ये मंदी येण्याची शक्यता 15 टक्के आहे.

भारत शेवटच्या क्रमांकावर

फ्रँकलिन टेम्पलटन या संस्थेच्या यादीत भारत अखेरच्या स्थानावर आहे. भारताच्या अगोदर या यादीत इंडोनेशिया आहे. या देशात मंदी येण्याची शक्यता केवळ दोन टक्के आहे. सौदी अरबसह ब्राझीलमध्ये मंदी येण्याची शक्यता 10 टक्के आहे. ब्राझील आणि इंडोनेशिया या उभारत्या अर्थव्यवस्था आहे. सध्या जीडीपीच्या बाबतीत हे दोन देश भारताला तगडं आव्हान देत आहे. चीनला पर्याय म्हणून भारत तर या दोन देशांना पर्याय म्हणून जागतिक कंपन्या, ब्रँड, उद्योजक इंडोनशिया आणि ब्राझीलला महत्व देत आहेत.